मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात थेट पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेने केलेली वैयक्तिक पातळीवरील टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागलेली आहे. पक्षश्रेष्ठींनीच ही टीका गंभीरपणे घेतल्यानेच आता राज्यातील सत्तेत शिवसेनेला घ्यायचे की नाही, हा निर्णय लांबणीवर टाकला जात आहे. सत्तेसाठी आसुसलेल्या शिवसेनेची जेवढी शक्य आहे तेवढी दमछाक करायची, असेच प्रयत्न भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून होत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाला फक्त पाच दिवस उरले असताना शिवसेनेला सत्तेत घ्यायचे की नाही, याचा निर्णय अद्याप भाजपने घेतलेला नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेमधील अविश्वासाचे वातावरण बुधवारीही कायम होते. या विषयावर सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अरुण जेटली व शिवसेनेचे खासदार अनिल देसाई या दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी ही बोलणी पुढे जाण्याचे नाव घेताना दिसत नाही. निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा यांची तुलना ‘अफझलखानाच्या फौजा’ अशी केली होती. या वक्तव्याबाबत त्यांना माफ केले असले तरी
आपल्या मुखपत्रामधून मोदींच्या वडिलांचा उल्लेख करण्याची किंमत आता शिवसेनेला मोजावी लागत आहे, असेही सांगितले जाते.
शिवसेना नसेल तर राष्ट्रवादी आहेच : एकनाथ खडसे
विधानसभा निवडणुकीच्या आधी जागावाटपावरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी िशवसेनेला चांगले सुनावले होते. भाजप एकट्याच्या ताकदीवर पुढे जाईल, आम्हाला शिवसेनेची गरज नाही, अशी भूमिका घेणा-या खडसेंचा अजूनही शिवसेनेबाबतचा दुराग्रह कायम असल्याचे दिसून आले. ते म्हणाले, ‘शिवसेनेने आम्हाला पाठिंबा दिला नाही तर काही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला बाहेरून पाठिंबा आहेच. विश्वासदर्शक ठरावावेळी तो दिसून येईल.’ शिवसेनेशी युती तोडण्याची घोषणाही भाजपने खडसेंच्याच मुखातून केली होती.
अटी-शर्थी चालणार नाहीत
शिवसेनेला भाजपबरोबर सत्तेत यायचे होते तर त्यांनी राज्यातील नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण त्यांनी तसे केले नाही. आम्ही बोलू तर दिल्लीतील भाजप नेत्यांशीच, अशी ताठर भूमिका घेतली. आमच्याकडून प्रस्ताव गेला असता तर दिल्लीतील नेत्यांनीही नरमाईचा सूर लावला असता. पण शिवसेना आपल्या भूमिकेवर अडून बसली. त्यामुळे आता शिवसेनेला सत्तेत घेण्याचा निर्णय झाला तरी भाजप देईल तीच पदे स्वीकारून यावे लागेल. शिवसेनेच्या अटी-शर्थी चालणार नाहीत, असेही भाजपमधील सूत्रांनी ठणकावून सांगितले.
स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर टीकाटिप्पणी सुरूच
एकीकडे सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उत्सुक असली तरी आपल्या मुखपत्रातून (सामनातून) भाजप नेत्यांवर कधी टीका, तर कधी टोलेबाजी करणेही सुरूच आहे. ‘महाराष्ट्रापासून विदर्भास तोडणे म्हणजे आईपासून मुलास तोडण्यासारखे आहे. विदर्भातील मुख्यमंत्र्याने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करावी म्हणजे महाराष्ट्राच्या रखवालदारानेच ‘घोटाळा’ करण्यासारखे आहे,’ असा टोला बुधवारी ‘सामना’तून देवेंद्र फडणवीस यांना लगावण्यात आला. विदर्भाचे मागासलेपण आहेच. ते दुरुस्त करण्याचे कर्तव्य पार पाडावे.
विदर्भ विकासासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांनीही हातभार लावावा, असा सल्लाही भाजप सरकारला देण्यात आला. फडणवीसांनी आपली ‘विदर्भ एक्स्प्रेस’ विकासाचा मार्ग बदलून स्वतंत्र विदर्भाच्या मार्गावर घसरू नये, अशी टीकाही करण्यात आली.