आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP President Amit Shah Meet Shiv Sena Chief Udhav Thacakrey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भ्रष्ट काँग्रेस नेत्यांचा पैसा मुले, पुतण्यांकडे शोधा! मुंबई भेटीत शहा यांचा काँग्रेसवर घणाघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्याच मुंबई भेटीत अमित शहा यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. काँग्रेसमुक्त महाराष्ट्राशिवाय काँग्रेसमुक्त भारत होणे शक्य नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मुळापासून उखडून फेका, असे आवाहन त्यांनी केले. गेल्या १५ वर्षात राज्यातील काँग्रेस सरकारने ११ लाख ८८ हजार कोटींनी महाराष्ट्राची लूट केली. हा पैसा शोधायचा असेल तर काँग्रेस नेत्यांची मुले, पुतणे, भाचे यांच्या घरी शोधा, अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसच्या कथित भ्रष्टाचारावर हल्ला केला.
येथील षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करताना शहा म्हणाले, केवळ राज्यातच नव्हे देशपातळीवरही राज्यातील काँग्रेस नेते भ्रष्टाचार करतात. काँग्रेसचे असे भ्रष्ट सरकार आणखी ५ वर्षे राहावे असे आपल्याला वाटते का? नाही ना. मग राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार मुळापासून उखडून फेका. कारण जोवर महाराष्ट्रात काँग्रेस आहे तोवर देश कधीच काँग्रेसमुक्त होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे महत्व कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.

पूर्वी महाराष्ट्राचे नाव उत्तम प्रशासन, सहकारी चळवळ, चारित्र्यवान नेते यांच्यासाठी घेतल्या जायचे. ही भूमी समर्थ रामदास, संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची आहे. मात्र गेल्या १५ वर्षातील सरकारने मान खाली घालायला लावणारे काम केलेय. त्यामुळे चारित्र्यवान भाजप नेत्यांच्या सरकारला निवडून द्या, असे आवाहनही शाह यांनी केले. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र कसा पिछाडीवर पडला, हे विविध आकडेवारींसह मांडताना शाह यांनी सत्ताधाऱ्यांची नियत चांगली असेल तर निसर्गही साथ देतो, असा मिश्किल टोला राज्यातील काँग्रेस आघाडीच्या नेत्यांना लगावला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नेहमीच आपल्या भाषणात राज्यात सहा वर्षे दुष्काळ पडत असल्याचे सांगतात. हे खरेही आहे. गुजरातेत नेहमीच दुष्काळ पडायचा. मात्र नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर १२ वर्षे एकदाही दुष्काळ पडला नाही, यावरून सत्ताधाऱ्यांची नियत चांगली असली तर निसर्गही साथ देतो, हे दिसून येते, अशा शब्दात त्यांनी काँग्रेस नेत्यांची खिल्ली उडवली. राज्यात भाजपचेच सरकार आले तर देशात आलेल्या मोदी सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासालाही गती मिळेल, अशा शब्दात त्यांनी भाजपला सत्ता देण्याचे आवाहन केले.
छत्रपतींचा आशीर्वाद, चले मोदी के साथ
महाराष्ट्रातील भाजपच्या प्रचाराचा श्रीगणेशा या सभेच्या माध्यमातून झाल्याची घोषणा शहा यांनी केली. लोकसभा िनवडणुकीसाठी अच्छे दिन आनेवाले है, असा नारा देणाऱ्या भाजपने आता विधानसभा िनवडणुकीसाठी "छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ' असा नवा नारा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात ही मािहती देत हा नारा कार्यकर्त्यांकडून गिरवून घेतला. यानंतर शहा यांनीही हाच नारा देत राज्यात नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संदेश घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन केले.
मातोश्रीवर ५० मिनिटे चर्चा
रात्री दहाच्या सुमारास ‘मातोश्री’वर जाऊन अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी उद्धव, आदित्य, तेजस यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. विधानसभा निवडणुकीत युतीने जोरकसपणे प्रचार करून राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणण्याचा विश्वास या वेळी उभय नेत्यांनी बोलून दाखवला. महायुतीतील जागा वाटपाबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या वेळी शहा यांच्यासमवेत देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार आदी उपस्थित होते.

दिग्गजचांचा पक्षप्रवेश
मराठवाड्यातील दिग्गज काँग्रेस नेते भास्करराव पाटील खतगावकर तसेच राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुते, सूर्यकांता पाटील आणि माधवराव िकन्हाळकर, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष दत्ता पाथ्रीकर, भगवंतराव पाचपुते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
नेत्यांसाठी भाजपची दारे उघडी
एकीकडे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारावर टीका करतानाच या पक्षातील चांगल्या नेत्यांसाठी आपल्या पक्षाची दारे उघडी आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती, चांगले उमेदवार, प्रचार यामुळे नव्हे तर केवळ कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीच्या बळावरच भाजप सत्तेत येऊ शकतो, असे शहा म्हणाले.