मुंबई - पुरणपोळी,चवदार भरली वांगी, झणझणीत मसाले भात.. आणि उकडीचे मोदक भाजप अध्यक्ष
अमित शहा यांच्या पहिल्या वहिल्या मुंबई भेटीतील जेवणाचा हा खास मराठमोळा मेन्यू. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या घरी झालेल्या या महाराष्ट्रीयन पाहुणचाराने शहा भारावून गेले.
गुरुवारी सकाळी मुंबईत आगमन झाल्यानंतर शहा सर्वप्रथम तावडे यांच्या निवासस्थानी गेले. तिथे उकडीचे मोदक आणि चीज ढोकळा असा खास बेत त्यांच्यासाठी ठेवण्यात आला होता. त्याचा आस्वाद घेताना उकडीचे मोदक
आपल्याला आवडल्याचे शहांनी आवर्जून नमूद केले. तावडेंच्या घरचा पाहुणचार घेतल्यानंतर अमित शहांनी भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक तेथेच घेतली. ही बैठक आटोपल्यानंतर ते पंकजा पालवे- मुंडे यांच्या वरळीतल्या घरी गेले. आणि तिथून दुपारच्या भोजनासाठी मुंबईतल्या खासदार आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पूनम महाजन यांच्या घरी रवाना झाले.
महाजन कुटुंबीयांनी शहा यांच्यासाठी खास मराठमोळ्या पद्धतीच्या जेवणाचा बेत केला होता. यात पुरणपोळी, भरलेली वांगी, मसाले भात आणि िशकरण आदी पदार्थांचा समावेश होता. अतिशय मोकळ्या वातावरणात जेवण होत असताना शहांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला. पूनम यांच्या आई रेखा महाजन यांच्याशी गप्पाही मारल्या.
गप्पांचा नेमका तपशील काय होता हे मात्र कळू शकले नाही. महाजन यांच्या घरी तास दीड तास व्यतीत केल्यानंतर शहा पुढे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रवाना झाले.
भाजपची नवी घोषणा : छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ
लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार मोदी सरकार’ ही भाजपची घोषणा भरपूर गाजली होती. त्याचा चांगलाच फायदा भाजपला झाला होता. ही बाब लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही मोदींचे नाव एन्कॅश करण्याचा प्रयत्न भाजपने चालवला आहे. यासाठी राज्याच्या प्रचारातही एक नवी घोषणा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चलो चले मोदी के साथ’ या नव्या घोषणेचे कार्यकर्त्यांनीही जोरदार स्वागत केले.
‘जागावाटपाची प्रतीक्षा नको, तातडीने प्रचाराला लागा’
विनोद तावडे यांच्या घरी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत शहा यांनी राज्यातल्या प्रमुख नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. महायुतीच्या जागावाटपाची वाट पाहता आता थेट प्रचाराला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले. काँग्रेस आघाडीचा प्रचार सुरू झालेला असताना महायुतीच्या प्रचाराचा कुठेही पत्ता नाही, याकडे लक्ष वेधत आता जागोजागी मेळावे घेण्याची सूचनाही त्यांनी केली. मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत केलेल्या कामाची जंत्री लोकांसमोर सादर करा आणि आघाडी सरकारचा गेल्या पंधरा वर्षांतल्या कुशासनाची पोलखोल करा, असा मंत्रच शहांनी दिला. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवार निवड प्रक्रियेचाही उपस्थित नेत्यांकडून आढावा घेतला.
या बैठकीला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे तसेच प्रभारी राजीव प्रताप रुडी, ओमप्रकाश माथूर आणि भाजप उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवी भुसारी आदी नेते उपस्थित होते.
शिवरायांची थोरवी सांगण्यासाठी कोणा शहांची गरज नाही : काँग्रेस
‘महाराष्ट्राला शिवाजी महाराजांची थोरवी सांगण्यासाठी कोणा आदिलशहा, कुतुबशहा किंवा अमित शहाची गरज नाही,’ अशा खोचक शब्दांत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अमित शहा यांच्या भाषणाची खिल्ली उडवली.
पुढील स्लाइडमध्ये, लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन