आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा सरकारी पाहुणे, मंत्र्यांचीही हाेणार झाडाझडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा १६ ते १८ जूनदरम्यान मुंबईच्या दाैऱ्यावर येत अाहेत. राज्य सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्यासह भाजपच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची साेय करण्यात अाली असून याच ठिकाणावरून ते भाजपच्या राज्यातील कामगिरीचा अाढावा घेणार अाहेत.  तसेच मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावरही ते काही बैठका घेणार अाहेत. दुसऱ्या दिवशी ते नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात येऊन पक्ष विस्ताराचा आढावा घेणार आहेत.
 
या कार्यक्रमासाठी सह्याद्रीवरील व्हीअायपी खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी विमानतळावर आगमन झाल्यानंतर शहा हे दादरला येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तसेच चैत्यभूमीला अभिवादन करतील. याशिवाय बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ व स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथेही भेट देणार आहेत. प्रभादेवीला जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याचाही त्यांचा विचार असल्याचे समजते.  
 
प्रभादेवीवरून सह्याद्री येथे आल्यानंतर सह्याद्री, वर्षा तसेच गरवारे क्लब येथे त्यांच्या बैठका होणार आहेत. पण मुख्य बैठकीचे स्थान असेल ते सह्याद्री. येथूनच वर्षा, प्रदेश कार्यालय, मुंबईतील पंचतारांकित हाॅटेल जवळ असल्याने या अतिथीगृहाचा पर्याय निवडण्यात आला आहे. सह्याद्रीवर पहिल्या दिवशी शहा भाजप सरकारच्या पावणेतीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेणार असून कुठल्या मंत्र्यांने काय कामगिरी केली याचे प्रगतिपुस्तक ते तपासतील. एखाद्या मंत्र्याची कामगिरी समाधानकारक वाटत नसल्यास त्यांचा ‘वेगळा विचारही’ हाेऊ शकताे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
भाेसरी भूखंड प्रकरणामुळे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या खांद्यावर भाजप सरकारची मोठी जबाबदारी आली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची कामगिरी उत्तम असली तरी पंकजा मुंडे, विनोद तावडे, गिरीश महाजन, गिरीश बापट, विष्णू सवरा, प्रकाश मेहता या पहिल्या फळीतील नेत्यांना फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. याची झाडाझडती शहा घेतील, अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे पक्षासाठी या नेत्यांचे काय योगदान आहे याचाही जाब विचारला जाणार असल्याचे समजते.
 
मध्यावधीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा  
‘सह्याद्री’वर भाजप मंत्र्यांची कामगिरी तपासल्यानंतर शहा हे ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहेत. ही बैठक अतिशय महत्त्वाची असून दोघेही मध्यावधी निवडणुकीचा अंदाज घेतील. शहा तसेच फडणवीस या दोघांकडे सर्व्हेचे आपापले अहवाल असून गुजरातबरोबर महाराष्ट्रातही निवडणूक घ्यायची झाल्यास भाजपला कितपत यश मिळू शकते याची चाचपणी या वेळी केली जाईल.  सत्तेत राहून सतत भाजपला लक्ष्य करणाऱ्या शिवसेनेचे लोंढणे आता फार काळ गळ्यात ठेवायचे नाही यावर शहा व फडणवीस यांचे जवळपास एकमत झाले आहे. चांगला पाऊस, कर्जमाफीचा निर्णय व पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याविषयी अजूनही जनमानसांत असलेली विश्वासार्हतेची भावना यामुळे भाजपला मध्यावधीत नक्कीच बहुमत मिळेल, असा दावा प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून केला जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...