आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp President Devendra Fadanvis Goes To Meet Raj Thackery

राज ठाकरेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये - देवेंद्र फडवणीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकूंजवर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण फडणवीस यांनी भेटीनंतर दिले. असे असले तरी आजच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा कुजबूज सुरु झाली आहे.

राज्यात गेली 14 वर्षे ठाण मांडून सत्तेवर बसलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष आणण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच यासाठी मनसे अतिशय महत्त्वपूर्ण सहकारी असल्याची जाणीव भाजपला पहिल्यापासून आहे.त्यासाठी राज यांच्यासोबत राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी व मुंबईच्या शहराध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचे कळते.


राज ठाकरे यांनी भाजपच्या प्रयत्नाला व विशालयुतीला पहिल्यापासून फाटा फोडला आहे. तुम्ही तिघे (शिवसेना, भाजप व रिपाई) आधी तिकीट वाटपाचा तिढा सोडवा व मग माझ्याकडे या, असे सांगत महायुतीला आत्मपरीक्षण करण्यास बजावले होते. मात्र, या विशालयुतीसाठी शिवसेनेपेक्षा भाजप फारच आग्रही आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे गेल्या विधानसभेच्या पराभावानंतर विश्लेषण करताना मनसेच्या मतविभाजनामुळे युतीचा पराभव झाल्याचे सांगितले होते. तेव्हापासूनच भाजप मनसेला युतीमध्ये येण्यासाठी डोळा मारत होते. मात्र राज यांनी भाजपमधील सर्व नेत्यांशी चांगले संबंध ठेवूनही या विषयाला गोडीगुलाबीत बगल देत आले आहेत.

आता मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक व अभ्यासू देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर समविचारी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून सत्तेवर ठाण मांडून बसलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादीला सत्तेपासून कोणत्याही परिस्थितीत दूर ठेवणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे राज यांना पुन्हा एकदा राज्यातील सद्य परिस्थिती लक्षात आणून देण्याकरिता फडणवीस राज यांच्या सदिच्छा भेटीला गेले असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, मंगळवारीच गोपीनाथ मुंडे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. तसेच त्यावेळी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत येण्याचे आमंत्रण दिले होते. विशेष म्हणजे शेट्टी यांनी मुंडे यांचे निमंत्रण तत्काळ स्वीकारले आहे.

राज्यातील सत्तेबाहेर असणा-या सर्व छोट्या-मोठ्या पक्षांना आता हे लक्षात आले आहे की, काँग्रेस- राष्ट्रवादीचा पाडाव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे. गेली काही वर्षे हाच मुद्दा गोपीनाथ मुंडे राज्यातील विरोधी नेत्यांपुढे मांडत होते. आता मात्र त्यासाठी प्रत्यक्ष काम सुरु झाले व त्यास काही प्रमाणात यशही मिळत आहे.

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार?- दरम्यान, मुंबई भाजपच्या शहराध्यक्षपद निवड प्रक्रियेला वेग आला आहे. मंगळवारी राज्याचे प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी पदाधि-यांशी चर्चा करुन मत आजमावले. त्यानंतर आमदार आशिष शेलार, अतूल भातखाळकर व प्रकाश मेहता यांची नावे पुढे आली आहेत. मात्र वकिल असल्याले शेलार यात बाजी मारतील, असे सांगितले जाते.

शेलार हे राज यांचे चांगले मित्र असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मुंबई शहराचा विचार केल्यास मनसे आणि भाजप चांगले संबंध कसे राहतील याचबरोबर भविष्यात एकत्र आल्यास तिकीट वाटप, पदाधिकारी संबंध याचा विचार करता शेलार यांच्या नावावर मुंडे व फडणवीस शिक्कामोर्तब करतील. त्यासाठी राज ठाकरे यांचे म्हणणेही ऐकले जावू शकते. त्यामुळे फडणवीस व राज यांच्या आजच्या भेटीत या विषयावरही चर्चा होणार असल्याचे कळते.