आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp President Devendra Fadanvis Goes To Meet Raj Thackery

महायुतीसाठी मनसेची मनधरणी; राज ठाकरे यांचे मात्र मौन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे महायुतीत येण्यासाठी मनसेची भाजपकडून मनधरणी केली जात असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात पुन्हा उधाण आले होते.

महायुतीमध्ये मनसेने यावे यासाठी याआधीही भाजपकडून प्रयत्न झाले आहेत. तसेच रिपाइं नेते रामदास आठवले यांनीही मनसेने महायुतीत यावे असे जाहीर निमंत्रण काही दिवसांपूर्वीच एका सभेमध्ये दिले होते. शिवसेनेने आधी या प्रयत्नांना पाठिंबा दिला व नंतर विरोधी भूमिका घेतली. मात्र राज ठाकरेंनी अशी शक्यता साफ फेटाळून लावली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली.

राजकीय रंग नको : फडणवीस
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, या भेटीला राजकीय रंग देऊ नये. आजच्या भेटीला कोणताही राजकीय संदर्भ नाही. राज यांच्याबरोबर सदिच्छा भेट होती. यापूर्वीही मी सांगितले आहे की, विरोधी पक्षांतील सर्व नेत्यांची भेट घेणार. त्यामुळे राजकीय अन्वयार्थ काढू नये, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांनी मात्र या भेटीबाबत मौन बाळगले आहे. फडणवीस यांनी गेल्या महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले यांचीही भेट घेतली होती. त्या वेळीही मनसेबाबत चर्चा झाल्याचे वृत्त होते.

सेनेमुळे भाजप, रिपाइं हैराण
मनसेने महायुतीत सामील व्हावे म्हणून गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, विनोद तावडे यांनी आधी प्रयत्न केले होते. फडणवीस यांनाही ‘एनडीए’च्या धर्तीवर सर्व विरोधकांना एकत्र आणून ‘एमडीए’ स्थापन करणार असल्याचे सांगितले होते. उद्धव ठाकरे यांनी आधी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. पण गेल्याच आठवड्यामध्ये ‘सामना’तून त्यावर टीका करण्यात आली. शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव व राज यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. एकूणच शिवसेनेच्या सतत बदलत्या भूमिकेमुळे भाजप आणि रिपाइंही हैराण आहेत.

राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची !
‘राज्यात सत्ता आणायची झाल्यास आपल्याच ताकदीवर आणू’, असे राज यांनी याआधी सांगितले होते. त्यामुळे या विषयावर भाष्य करण्याचे मनसेकडून टाळले जात आहे. राज यांना खरोखरच महायुतीमध्ये जायचे असेल तर ते सशर्त निर्णय घेतील, असाही अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवतात. त्यामुळे भाजप, रिपाइं यांनी मनसेने महायुतीत येण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी राज ठाकरे जोपर्यंत प्रतिसाद देत नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाही. त्याच वेळी शिवसेनेची ठाम भूमिकाही महत्त्वाची असेल.