आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Reply To Shivsena Over Uddhav Tahckeray Statement

ही शिवसेना बाळासाहेबांची नाही, सेनेचा राष्ट्रवाद तपासा- भाजपचा पलटवार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रोहित वेमुला, हार्दिक पटेल आणि आता कन्हैया या तिघांनाही देशद्रोही ठरवण्यात येतयं. आपला देश हा जगातला सर्वात तरुण देश आहे. युवक हा आपल्या देशाचे भवितव्य ठरवीत असतो. ‘जेएनयू’मधील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारचा जन्म का झाला, हा विचार ज्याने त्याने करायचा आहे असा सवाल करीत मोदी सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणा-या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर भाजपने पलटवार केला आहे.
अफजल गुरूसारख्या देशाच्या विरोधात ज्यांनी कारवाया केल्या त्यांचे समर्थन जे तरूण करीत आहेत त्यांना शिवसेना हिरो म्हणत आहे. त्यामुळे शिवसेनेचा राष्ट्रवाद व हिंदुत्त्ववाद पुन्हा एकदा तपासण्याची वेळ आली आहे. ही शिवसेना वेगळी असून, ती बाळासाहेब ठाकरेंची ही नाही, अशी टीका भाजपचे आमदार गिरीश व्यास यांनी केली आहे. तर, शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे असे सांगत भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना मागील काही दिवसापासून भाजपवर वारंवार टीका करीत आहे. हार्दिक पटेल, उत्तराखंड प्रकरण असो की आता कन्हैया कुमार प्रकरण असो शिवसेनेने भाजपवर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडलेली नाही. दुष्काळाच्या मुद्यांवरून तर शिवसेना मोदी व फडणवीस सरकारला रोजच झोडत आहे. रविवारी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र शिबीरातही उद्धव ठाकरे यांनी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. अखेर भाजपने यावर मौन सोडले असून, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
गिरीश व्यास म्हणाले, शिवसेनेची ही भूमिका न पटणारी आहे. ज्या लोकांनी देशाच्या विरोधात कारवाया केल्या. त्यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेला कन्हैया कुमार शिवसेनेला हिरो वाटत असेल तर काय म्हणावे?. शिवसेना पक्षप्रमुखांनी याचा बारकाईने विचार करायला हवा. शिवसेनेचा राष्ट्रवाद तो हाच का असाही प्रश्न पडू लागला आहे. शिवसेनेची हिंदुत्त्वावादाची व्याख्या काय ते ही समजून घेतले पाहिजे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनीही शिवसेना गोंधळलेल्या स्थितीत आहे असे सांगत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली आहे.