आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Says Shivsena Should Give Unconditional Support

भाजपची भूमिका "वेट अँड वॉच', फायद्या-तोट्याचा विचार न करण्याचा शिवसेनेला सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीवर बहिष्कार टाकून शिवसेनेने भाजपला राष्ट्रवादीबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर भाजपने त्यावर सौम्य शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेने सत्तेतील फायद्या-तोट्याचा विचार न करता हिंदुत्वासारख्या तात्तविक मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी भूमिका घेत भाजपने शिवसेनेची पुन्हा कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीतल्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावून मुंबईत परतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट मुंबईच्या भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यापाठोपाठ शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटीलही अाले. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मोदींवर विश्वास ठेवून शिवसेनेने सरकारमध्ये सामिल व्हायला हवे होते. मोदींचे निमंत्रण म्हणजे केंद्रात आणि राज्यात सर्व बाबी योग्य पद्धतीने होतील, असा विश्वास बाळगायला हवा होता. मात्र शपथविधीसाठी अनुपस्थित राहणे हे भाजपसाठी दु:खद आणि दुर्दैवी आहे. यापुढे शिवसेनेने पदे, मंत्रिपदांची संख्या किंवा खाती यापेक्षा हिंदुत्वासारख्या तात्विक मुद्द्यावरच चर्चा करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय नेत्यांवर भाजपची भिस्त
भाजपच्या राज्यातल्या नेत्यांची बैठक रात्री झाली. यात राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यात आली. शिवसेनेबाबतच्या अंतिम निर्णयापूर्वी केंद्रीय नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णयही या वेळी प्रदेश नेत्यांनी घेतला.
सेनेने साेबत यावे, अन्यथा राष्ट्रवादी अाहेच : खडसे
भाजप अधिवेशनात बहुमत सिद्ध करणार असा विश्वास महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पाठिंबा मागितला नसतानाही त्यांनी दिला आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांचा पाठिंबा घेऊ, असे स्पष्ट करून शिवसेना पाठिंबा देईल अशी अपेक्षा व्यक्त केली. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खडसे म्हणाले, ‘केंद्रात शिवसेनेने बहिष्कार टाकला असला तरी निवडणुकीदरम्यान झालेले आरोप-प्रत्यारोप विसरून शिवसेनेला सोबत घेण्याचे अाम्ही ठरवले आहे. मान-अपमानाचा विषय न करता राज्याला स्थिर सरकारसाठी केंद्रातही त्यांना स्थान देण्याचे ठरवले होते. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातही शिवसेनेने बरोबर यावे असे आम्हाला वाटते. लोकांनी निवडून देताना स्थिर सरकारसाठी सर्वांना िनवडून दिले आहे. त्यामुळे आमची पुढे जायची तयारी आहे. आम्ही अनुकूल आहोत आणि शेवटपर्यंत शिवसेना सोबत येईल अशी आशा आहे.’ अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही नागपुरात पत्रकारांशी बाेलताना, शिवसेनेने अामच्यासाेबत सत्तेत यावे, अशी अपेक्षा बाेलून दाखवली.
बहुमत तर मिळवणारच
‘भाजपचे सरकार हे बहुमतातीलच असेल. तसेच सध्या आहे त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवू, राष्ट्रवादीने आम्हाला जाहिर पाठिंबा दिला आहे. भाजपने त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी कोणतीही मागणी केली नव्हती, असेही खडसे म्हणाले.