आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण:130 जागा पदरात पाडत भाजपने साधला डाव; आता करणार शिवसेनेचा \'गेम\'?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- भाजप व शिवसेनेच्या बैठकीत मंगळवारी भाजपच्या नेत्यांनी सेनेकडून 130 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या.)
मुंबई- 20 दिवसावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने अखेर शिवसेनेला व उद्धव ठाकरेंना आपल्या चाणक्यनितीत अडकवलेच. मंगळवारी भाजपने शिवसेनेकडून आपल्या पदरात 130 जागा पाडून घेतल्या व आता घटकपक्षांना वा-यांवर सोडून देत सेनेलाही धोबीपछाड दिल्याचे दिसून येत आहे. मागील काळात राष्ट्रवादीने काँग्रेसने काँग्रेससोबत जी राजकीय 'चाल' खेळली त्याचा पुढचा अंक राज्यात भाजप व सेनेत चालणार असल्याचे आजच्या घडामोडीतून स्पष्ट होत आहे.
भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा मागील तीन आठवड्यापासून सुरु होता. मात्र, शिवसेना भाजपला 120 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नव्हता. त्यामुळे मागील काही दिवस भाजप-सेना युतीच तुटणार व भाजप स्वबळावर लढणार अशा बातम्या येत राहिल्या. भाजपने तशी राजकीय व्यूहरचना आखून महायुतीबाबत आग्रही होती. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी व काँग्रेसमधून बंडखोर व नाराज नेते आपल्या पक्षात घेत होती. याचवेळी आपल्या किमान 80 ते 90 जागी उमेदवार कसे निवडून येतील याची खेळी केली. ही खेळी नितीन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ खडसे यांनी पद्धतशीर केली. दुसरीकडे, फडणवीस व इतरांना शिवसेना व घटकपक्षांशी बोलणी करण्यास धाडले. त्याचेवळी खडसे यांनी शिवसेनेच्या विरोधात उघड भूमिका घेत उद्धव ठाकरेंवर दबाव वाढविला. भाजप स्वबळावर लढण्यास तयार आहे यासाठी पद्धतशीर बातम्या पेरल्या गेल्या. त्यामुळे महायुतीतील घटकपक्षांनी यांच्यातील वाद मिटावेत यासाठी आम्हाला केवळ 18 जागा दिल्या तरी चालतील पण तुमचे भांडण मिटवा व महायुती टिकवा अशी भूमिका घेतली. याचवेळी शिवसेनेने भाजपला 119 जागा व मित्रपक्षांना 18 जागा देऊ केल्या. तरीही भाजपने हा प्रस्ताव नाकारला व महायुती तुटली तर आम्हाला जबाबदार धरू नका असा दबाव सेनेवर वाढवला.
अखेर मोजकेच दिवस बाकी राहिल्याने जागावाटपाची कोंडी फोडण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. त्यानुसार शिवसेनेने भाजपला 130 जागा देऊ केल्या व घटकपक्षांना 7 जागा देऊन तुम्ही त्यांचे समाधान करा असा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव भाजपने चटकन स्वीकारत घटकपक्षांना सोबत न घेता भाजप-सेना युती अभेद्य आहे व राहील अशी घोषणा केली. मात्र, भाजपकडून घटकपक्षांना कोणतेही आश्वासन दिले नाही तसेच मोठे मन दाखवा व या 7 जागा घ्या असे बैठकीत सांगितले. अर्थातच घटकपक्षांना हा प्रस्ताव मान्य होणार नव्हता. योग्य जागा न मिळाल्यास घटकपक्ष बाहेर जातील याची व्यवस्था भाजपने पद्धतशीरपणे केली व यातून त्यांनी शिवसेनेपुढेच आव्हान निर्माण केले आहे. 130 जागा पदरात पाडून घेत यातील जास्तीत जास्त कशा निवडून आणता येतील याची रणनिती भाजपमध्ये सुरू आहे. जेणेकरून शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपद हस्तंगत करता येईल.
घटकपक्ष बाहेर पडले तर भाजपला पश्चिम महाराष्ट्रात काही जागांवर नक्कीच फटका बसणार आहे. मात्र, त्याहून कित्येक पटीने फटका शिवसेनेला बसणार आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रातच सर्वाधिक जागा सेनेकडे आहे. याच पट्ट्यात शेट्टी व जानकर यांची ताकद आहे. दुसरीकडे, भाजपची ताकद विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पुणे, नाशिक पट्ट्यात भाजप शिवसेनेसोबतच्या युती चांगल्या जागा जिंकून आणू शकतो. त्यामुळे भाजप ज्या रणनितीने काम करीत आहे त्यात यशस्वी होण्याची जास्त शक्यता आहे. जानकर व शेट्टी यांनी मिळून पश्चिम महाराष्ट्रात आपले उमेदवार उभे केले त्याचा फटका शिवसेनेला बसणार तर फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. त्यामुळे अशा स्थितीत शिवसेनेपेक्षा भाजपचेच जास्त आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. एकदा सर्वात जास्त आमदार निवडून आणले तर मुख्यमंत्रीपद मिळवायचे. सेनेने त्यास हरकत घेतली तर राष्ट्रवादी व मनसेच्या काही आमदारांचा पाठिंबा घेण्याचा मार्ग मोकळा ठेवायचा, अशी शिवसेनेला धोबीपछाड द्यायचा अशी रणनिती भाजपची दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीतील बंडखोर नेते व ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळणार नाहीत असे नेते भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. यामागे शरद पवार व नितीन गडकरी यांचे काहीतरी गूळपीठ असल्याची चर्चा आहे. 1995 मध्येही काँग्रेसने जेव्हा शरद पवारांची कोंडी केली होती तेव्हा त्यांनी अपक्षांच्या मदतीने शिवसेनेने सरकार स्थापन करावे, अशी भूमिका घेतल्याचे आजही चवीने बोलले जाते. आता राजकीय स्थित्यांत्तर होत असताना पवार-गडकरी जोडी काही नविन राजकीय समीकरण तर जन्माला घालत नाही ना अशी शंका यावी अशी स्थिती आहे.