आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp shivena Still Conflicts On Seat Sharing Issue

युतीचा घोळ: सेनेची भूमिका ठाम; भाजपचा बैठकांवर जोर, स्वबळाची चाचपणी सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेने भाजपला जागावाटपाबाबत पुन्हा नव्याने प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेच्या सर्व बड्या नेत्यांची मुंबईत बैठक होत आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकांसमोर व देशासमोर आपली भूमिका जाहीर करतील असे शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी माध्यमांना सांगितले. शिवसेनेने दिलेल्या फॉर्म्यूल्यावर भाजपने होकार कळविल्यास जागांच्या अदलाबदलीची चर्चा करण्यास उद्धव ठाकरे तयार आहेत, असे सेना नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना भेटले. भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्या वरळी येथील निवासस्थानी ही बैठक भेट झाली. भेटीतील तपशील समजू शकला नाही. शिवसेनेने दिलेल्या नव्या फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यासाठी प्रदेश भाजप कोअर कमिटीची बैठक पुन्हा खडसेंच्या घरी सुरु आहे.
काय आहे शिवसेनेचा भाजपला नवा फॉर्म्यूला, घटकपक्षांना ठेंगा- दरम्यान, दबावाच्या राजकारणाला वैतागून शिवसेनेने भाजपला नवा आणखी एक जखमेवर मीठ चोळायला लावणारा फॉर्म्यूला दिला आहे. त्यानुसार शिवसेनेला 155 जागा, भाजपला 126 जागा व राजू शेट्टींच्या स्वाभिमानीला 7 जागा सोडू असे म्हटले आहे. उर्वरित तीन घटकपक्ष असलेल्या आठवले, जानकर व मेटे यांना भाजपने आपल्या कोट्यातून काही जागा सोडाव्यात अथवा विधान परिषेदवर सामावून घ्यावे असे सेनेने भाजपला दिलेल्या नव्या फॉर्म्यूल्यात सुचविले आहे.
घोळ सुरूच- युती तोडणार नाही अशा सेना-भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली असली तरी पडद्यामागे मात्र वेगळेच घडत आहे. तसेच दोन्ही पक्षांत कोणताही सुसंवाद नसून, दोघेही स्वबळाची तयारी करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी रात्री भाजपला सेनेने फॉर्म्यूला दिला आहे त्यांच्या निरोपाची वाट पाहत असल्याचे वक्तव्य केले आहे. आज सकाळी भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर यांनी शिवसेनेने कोणताही नवा फॉर्म्यूला दिलेला नाही असे सांगितले. तसेच भाजपच्या उमेदवारांची यादी उद्या पक्षाच्या संसदीय बोर्डाकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
प्रदेश भाजप कोअर कमिटीची मुंबईत एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला निवडणूक प्रभारी ओ पी माथूर, राजीव प्रताप रूडी, फडणवीस, तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगुंटीवर, खडसे आदी सर्व नेते उपस्थित होते. यानंतर माथूर यांनी ही माहिती दिली. प्रदेश नेत्यांनी यावर कोणतेही प्रतिक्रिया दिली नाही हे विशेष.
पुढे वाचा,
- युतीसाठी मोदी अनुकूल, गडकरींचा विरोध?
- अमित शहा व प्रदेश भाजपची वेगळीच रणनिती...