आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Shivsena Came Together After Attacking Each Other In Election

पुन्हा युती... अाधी भांड भांड भांडले, अाता सत्तेसाठी गळ्यात गळे !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या निवडणूक प्रचारात एकमेकांच्या जबड्यात हात घालून दात माेजण्यापर्यंत मजल मारलेल्या शिवसेना- भाजप या सत्तेतील मित्रपक्षांनी अाता महापाैर- उपमहापाैरपद मिळवण्यासाठी पुन्हा गळ्यात गळे घालण्यास सुरुवात केली अाहे. महापौरपदाचा अर्ज भरण्यासाठी शनिवारी दुपारपर्यंत मुदत असल्याने शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे नेते, उद्याेगमंत्री सुभाष देसाई आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठक होऊन त्यांनी पालिकेतील युतीचा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार शिवसेना नेते एकनाथ शिंदे व भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना देण्याचा निर्णय घेतला.

शिवसेना - भाजपने कल्याण- डोंबिवली महापािलका निवडणुकीत एकमेकांवर हल्लाबोल केला होता. शिवसैनिकांना मुद्दामहून त्रास दिला जात असल्याच्या कारणावरून एकनाथ शिंदे यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यावर कडी म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर प्रसंगी सत्ता साेडण्याची धमकी दिली. याला कडक प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही ‘आम्हाला लेचेपेचे समजू नका, वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजण्याची धमक भाजपमध्ये आहे, असे गरजले हाेते. या निवडणुकीत शिवसेना व भाजप या दाेन्ही पक्षांच्या जागा वाढल्या असल्या तरी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी मनसे किंवा अपक्षांना गाेंजारण्यापेक्षा याच मित्रपक्षांनी पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या अाहेत.
१२२ सदस्य संख्या असलेल्या या पालिकेत बहुमतासाठी ६३ नगरसेवकांची गरज अाहे. शिवसेनेचे ५२ नगरसेवक असल्याने त्यांनी अपक्ष ११ नगरसेवकांशी चर्चा सुरू केली होती. मात्र, हे सर्वजण शिवसेनेच्या बाजूने येण्यास तयार नाहीत. जशी शिवसेनेची अवस्था तशीच भाजपही काेंडीत सापडली अाहे. ४२ जागा असलेल्या भाजपला बहुमतासाठी २१ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज अाहे. त्यामुळे अवघ्या नऊ जागा मिळवलेल्या मनसेचा भाव वाढू लागला हाेता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेप्रमाणे भाजपनेही राज ठाकरेंचे महत्त्व फार वाढू नये, यासाठी शेवटी कडवटपणा मागे टाकून बोलणी करण्याचे पाऊल टाकले. दरम्यान, ‘अापण काेणालाही पाठिंबा देणार नसून युतीचे राजकारण त्यांना लखलाभ हाेअाे’ अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
महापौर शिवसेनेचाच !
प्राथमिक बोलणीनुसार शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपच्या पदरात स्थायी समितीचे महत्त्वाचे पदही जाईल, असे बोलले जाते. मात्र, त्याला शिवसेना िकतपत राजी होईल, याविषयी शंका आहे. यासाठी तडजोड म्हणून स्थायी समितीनंतर इतर महत्त्वाची समितीची अध्यक्षपदे भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिवसेना आपला सन्मान साेडून कोणतीही तडजोड करणार नसल्याचे स्पष्ट केले.