आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युती सरकारमध्ये मतभेद: उद्धव यांचा भाजपला इशारा तर खडसेंचेही प्रत्युत्तर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्या भाजपचे सरकार अस्थिर होते ते शिवसेनेने स्थिर केले आहे. मात्र, मराठी माणसाचे हित न जोपसल्यास फडणवीस सरकार पाडू असा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर भाजपनेही प्रत्त्युत्तर दिले आहे. शिवसेनेला फक्त सरकारच स्थिर करायचे असेल बाहेरून पाठिंबा देऊनही ते करता येईल असे सांगत तर शिवसेनेने मंत्रिमंडळातून बाहेर पडावे असा खोचक सल्ला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिला आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी बाळासाहेबांवर आधारित असलेल्या बाळकडू सिनेच्या प्रिमीयरला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांनी उद्धव यांना मराठी माणसांच्या हिताबाबत छेडले असता उद्धव यांनी भाजप सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता. आम्ही भाजपचे सरकार फक्त स्थिर केले आहे. या सरकारने जनतेच्या हिताची कामे केली, तर आम्ही त्यांना दिलेला पाठिंबा कायम ठेवू. मात्र, मराठी माणसाचे हित न जपले गेल्यास शिवसेना गप्प बसणार नाही असे वक्तव्य उद्धव यांनी केले होते.
मी माझ्या पद्धतीने आतापर्यंत सर्वांनाच बाळकडू दिले आहे ते यापुढेही देत राहीन असेही सांगत उद्धव यांनी भाजपला लक्ष्य केले. 'सामना'तून भाजपला दिलेले उपदेशाचे डोस हेच बाळकडू असल्याचे उद्धव यांना सूचित करायचे होते. शिवसेनेला भाजपने कमी महत्त्वाची खाती दिल्याने उद्धव ठाकरे समाधानी नाहीत. मात्र, त्यांनी परिस्थिती पाहून मिळेल ते घेण्यात धन्यता मानली आहे. मात्र, भाजपविरोधात असलेली खदखद शिवसेना व उद्धव ठाकरे वेळोवेळी बोलून दाखवत आहेत.
दुसरीकडे, उद्धव यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांना प्रत्त्युत्तर दिले आहे. शिवसेनेशिवाय आमचे सरकार यापूर्वीही स्थिर होते. तसेच आता सेना सत्तेत सहभागी झाल्याने सरकार आणखी स्थिर झाले आहे. मात्र, शिवसेनेला आमचे सरकार फक्त स्थिरच करायचे असेल तर मंत्रिमंडळात सहभागी न होताही बाहेरून पाठिंबा देऊन स्थिर करता येते असे खडसेंनी टोला लगावला. फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेना सत्तेत सहभागी नव्हती तेव्हा भाजपचे सरकार राष्ट्रवादीने बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर टिकून होते हेच खडसेंना सूचित करायचे आहे.
सध्या राज्यात युतीचे सरकार नावाला असले तरी या सरकारमध्ये भाजपचा वरचष्मा आहे. त्यामुळे शिवसेना भाजपला लक्ष्य करीत आहे. भाजपही तेवढ्याच आक्रमतेने सेनेला उत्तर देत आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे या दोन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रामदास कदमांचा मुख्यमंत्र्यांना टोला- पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांसारखे दोन नंबरचे पैसे घेऊन कामे करू नका असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपला फटकारले आहे. मुंबईत घरांच्या किमती कोट्यावधीच्या घरात आहेत. मराठी माणसांना व कामगारांना मुंबईत घरे मिळाली पाहिजेत मात्र दोन नंबरचे पैसे देऊन बिल्डरांच्या घशात जमिनी घालू नका असे कदम यांना सुचवायचे होते. यावरूनही आता भाजप-शिवसेनेत तू-तू मै-मै होण्याची शक्यता आहे.
भाजपने मरीन ड्राईव्हची शान घालवली- वीज बचतीसाठी मुंबईत भाजपने एलईडी दिवे लावण्यावरूनही भाजप-शिवसेनेत तू-तू मैं-मैं सुरू झाले आहे. पांढ-या रंगाच्या एलईडी दिव्यामुळे मरीन ड्राईव्हची शान गेली आहे असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एलईडी दिवे लावण्याचे समर्थन केले आहे. एलईडी दिवे लावल्याने वीजेचे बचत होईल तसेच झगमगाटही कायम राहील असे शेलार यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, उद्धव ठाकरे यांच्या टि्वटर खात्यावरून काय टि्वट करण्यात आले आहे...
आदित्य ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात कसे रंगले आहे टि्वटरवरून शाब्दिक युद्ध.. पाहा पुढे...