आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी उद्या मतदान: युतीच्या आमदारांचे मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलात 'लाड'!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसाद लाड - Divya Marathi
प्रसाद लाड

मुंबई- विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या एकमेव जागेच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या ( गुरूवार, 7 डिसेंबर) मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेकडून प्रसाद लाड मैदानात उतरले आहेत तर, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सोलापूरचे दिलीप माने मैदानात आहेत.

 

दरम्यान, उद्याच्या मतदानासाठी सर्व आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. युतीचे उमेदवार प्रसाद लाड यांनी भाजप-शिवसेनेच्या आमदारांची बडदास्त मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना, नेत्यांना साधेपणाने राहण्याची, वागण्याचा सल्ला, शिकवण दिली आहे. मात्र, नेत्यांकडून त्याचे वारंवार उल्लंघन होताना दिसत आहे. प्रसाद लाड यांचे सुमारे 200 आमदारांसह शेकडो पदाधिका-यांना आता फाईव्ह स्टार हॉटेलात ठेवणे हे कृत्य पैशाची उधळपट्टी करणारे आहे.

 

श्रीमंत असल्यानेच भाजपकडून लाड-

 

प्रसाद लाड हे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ते म्हाडाचे अध्यक्ष होते. लाड यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीत असताना विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. उद्योजक म्हणूनही त्यांची मुंबईत ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी लाड भाजपमध्ये आले. श्रीमंत उमेदवार असल्याने प्रसाद लाड यांना भाजपकडून तिकीट मिळाले, असे बोलले जात आहे.

 

प्रसाद लाड 200 कोटींच्या संपत्तीचे मालक-

 

विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून अर्ज भरणारे प्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती आहे. अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, लाड यांच्याकडे 47 कोटी 71 लाखांची जंगम मालमत्ता आहे. यापैकी 39 कोटी 26 लाख शेअर्स व बाँडच्या स्वरूपात गुंतवले आहेत. पत्नी नीता यांच्याकडे 48 कोटी 95 लाख, मुलगी सायलीकडे 1 कोटी 15 लाख व मुलगा शुभमकडे 28 लाख 28 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्याकडे 56 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील कार्यालय, दादर येथील एक व्यावसायिक इमारत, दादरच्या कोहिनूर मिल इमारतीतील सदनिका व माटुंग्यात निवासी इमारत आहे.

 

नीता यांच्याकडे 54 कोटी 94 लाखांची स्थावर संपत्ती आहे. त्यात खालापूरची शेतजमीन, माटुंगाची व्यावसायिक इमारत, चेंबूरच्या निवासी इमारतीचा समावेश आहे. लाड कुटुंबीयांकडे सामूहिक 10 कोटी 45 लाखांची स्थावर मालमत्ताही आहे. लाड वर्षाला चार कोटी 22 लाख इन्कमटॅक्स भरतात, तर त्यांची पत्नी 1 कोटी 84 लाख आयकर भरत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती....

बातम्या आणखी आहेत...