आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने मारली लक्षणीय मुसंडी; उपनगरांमध्ये मिळवले प्रचंड यश, शिवसेनेला मतदारांनी दिला अंतिम इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई - भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत मारलेली मुसंडी जोरदार आहे. २०१२ मध्ये भाजपला येथे फक्त ३१ जागा मिळाल्या होत्या. याउलट शिवसेनेच्या नावावर ७६ जागा होत्या. मात्र, या वेळी दोन जागांचा फरक पाहता शिवसेनेच्या बरोबरीने त्यांनी एवढे मोठे यश मिळवले, हे लक्षात घ्यायला हवे. लालबाग, परळ, शिवडी, प्रभादेवी, वरळी, दादर येथे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे यश मिळवले असले तरी त्यांची मुंबई उपनगरात झालेली पीछेहाट भविष्यात त्यांना विचार करायला लावणारी आहे.
   
उपनगरात सायनपासून ते मुलुंडपर्यंत आणि वांद्र्यापासून ते दहिसरपर्यंत मराठी माणसांची संख्या इतर भाषकांपेक्षा अजून तरी पुढे आहे आणि हाच शिवसेनेसाठी भविष्यात कळीचा मुद्दा ठरेल. हा शिवसेनेला मुंबईकर मतदारांनी दिलेला अंतिम इशारा आहे. यापुढे भावनिक मुद्द्यांवर निवडणुका जिंकता येणार नाही, असेच मुंबईकरांनी सेनेला बजावले आहे.  मुंबईत सध्या २८ टक्के असलेला मराठी माणूस एकमताने शिवसेनेच्या बाजूने उभा राहिलेला नाही, हे निकालावरून दिसून आले आहे. २०२२ मध्ये पुढची निवडणूक येईल तोपर्यंत मराठी माणसांचा हा टक्का आणखी कमी झालेला तर असेलच, पण त्यातही परिस्थिती कशीही असो शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा  राहणाऱ्या मतदारांच्या संख्येतही घट झालेली असेल.   
 
भाजपचा शिवसेनेला ब्रेक  
उपनगरात गुजराती भाषिकांसह मारवाडी, उत्तर भारतीय, बिहारी यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, या साऱ्यांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली असली तरी मराठी माणसांनीही फडणवीसांच्या विकासाच्या अजेंड्यालाही मोठ्या संख्येने मते दिली आहेत, हे विसरून चालणार नाही. गोरेगाव, कांदिवली, मालाड, बोरिवली, मुलुंड या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने शत प्रतिशत यश मिळवले आहे.
 
या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेला एखाद दुसरा अपवाद वगळता यश मिळालेले नाही. विधानसभेत भाजपचे १५, तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आले होते. अडीच वर्षांनंतरही जवळपास हेच चित्र दिसून येत असेल तर पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेवर सरशी मिळवल्याचे स्पष्टपणे दिसते. शिवसेना भलेही म्हणत असेल की ८४ जागांसह आम्ही सर्वात मोठा पक्ष असू मात्र भाजपच्या अभूतपूर्व यशाने त्यांना रोखले आहे.
बातम्या आणखी आहेत...