आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण: भाजपपेक्षा शिवसेनेसोबत जाण्यातच महादेव जानकर व राजू शेट्टींचे हित!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शिवसेनेसोबतची 25 वर्षाची वैचारिक युती तोडून भाजप तीन घटकपक्षांना सोबत घेऊन नवयुती करण्याच्या तयारीत आहे. जागावाटपात शिवसेना नमते घेत नसल्याचे सांगून भाजपला सेनेसोबतची राजकीय युती तोडायची असल्याचे भाजपच्या नेत्याच्या प्रतिक्रियेवरून दिसत आहे. यात एकनाथ खडसे, विनोद तावडे व सुधीर मुनगुंटीवर ही त्रयी युती तोडण्यावर ठाम आहे. शिवसेनेसोबतची युती तुटावी यामागे भाजमधील राज्यातीलच एक बडा नेता कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेसोबतची युती तोडून भाजप राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम आदी तीन घटकपक्षांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी कार्यरत झाला आहे. राजू शेट्टी, महादेव जानकर व विनायक मेटे यांच्याशी भाजपने संपर्क साधला आहे. मात्र या नेत्यांनी अद्याप आपले पत्ते उघडे केले नाहीत. असे असले तरी भाजप शेट्टी, जानकर व मेटे यांना आपल्याकडे कोणत्याही परिस्थितीत खेचण्यासाठी उत्सुक आहेत. विनायक मेटेंनी शेट्टी-जानकर यांच्यासह भाजपमध्ये जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात आता कुठे नावारूपाला येऊ घातलेल्या या छोट्या पक्षांनी भाजपसोबत जाणे योग्य ठरेल की शिवसेनेसोबत यावर आम्ही टाकलेला प्रकाशझोत...
भाजपची चाल काय?- भाजपला सेनेसोबतची राजकीय युती तोडण्याची इच्छा आहे. याचबरोबर महायुतीतील शेट्टी, जानकरांसोबत त्यांना नवयुती तयार करायची आहे. त्याचमुळे भाजप नेते महादेव जानकर व विनायक मेटेंच्या गाठीभेठी घेण्यात मश्गुल आहेत. आज सकाळीच दहा वाजता देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी मेटे व जानकरांची भेट घेतली. तसेच आमच्यासोबत आल्यास तुमचा फायदा कसा आहे व आम्ही तुम्हाला काय-काय देऊ शकतो असे सांगत मन वळविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. अर्थात भाजपच्या आश्वासनाला केवळ जानकरच भुलू शकतात. शेट्टी व मेटे हे चाणाक्ष व वास्तवतेचे राजकारण करणारे नेते आहेत. त्यामुळे ते सहजासहजी भाजपच्या आश्वासनाला भाळतील असे आता तरी वाटत नाही.
शेट्टींना राष्ट्रीय राजकारणात भाजपने एखादे मंत्रीपद देऊ केले तरच शेट्टी भाजपमागे जातील अन्यथा नाही अशी स्थिती आहे. मेटे मात्र भाजपमागे जाऊ शकतात. कारण मेटेंचे टोकाचे राजकारण शिवसेनेला खासकरून उद्धव यांच्यासारख्या मृदू नेत्याच्या पचनी पडणारे नाही. मेटे मूळातच गोपीनाथ मुंडेंच्या मदतीने महायुतीत आले होते. त्यावेळी सेना मेटेंच्या विरोधात होती. मात्र मुंडेंनी मेटेंची जबाबदारी माझ्यावर सोडा, मी त्यांचे काय करायचे ते बघतो असे सांगत उद्धव यांना शांत केले होते. तसे मुंडेंनी सगळ्याच पक्षांना महायुतीत आणले होते. मात्र, या पक्षांना महायुतीत घेण्यास उद्धव यांचा विरोध नव्हता जो मेंटेंना होता. त्यामुळे मेटेंना पंकजा मुंडे यांच्यासोबत राहण्याशिवाय पर्याय नाही. कारण ते दोघेही मराठवाड्यात व बीडमधून येतात. त्यामुळे मेटे भाजपकडे जातील, हे उघड आहे. मात्र, मेटेंच्या मागे विशेष जनमत नाही. त्यामुळे भाजप मेटेंना विधानपरिषदेवर संधी देण्यापलिकडे कोणतेही आश्वासन देणार नाही हेेे उघड आहे. मेटेंही त्यावर समाधानी राहतील व भाजपसोबत राहतील असेच चिन्ह आहे.
भाजपला मात्र महादेव जानकर व राजू शेट्टी आपल्यासोबत राहावेत असे मनापासून वाटते. याचे कारण जानकर यांच्यामागे मोठे जनमत आहे. जानकर ज्या समाजाचे आहेत तो समाज त्यांच्यामागे आहे ते नुकतेच बारामती झालेल्या आंदोलनात दिसून आले आहे. जानकर धनगर समाजाचे नेते आहेत. राज्यात धनगर समाजाची संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजपला ते कोणत्याही स्थितीत हवे आहेत. याचबरोबर जानकर यांची राजकीय महत्त्वकांक्षा कोणतेही नाही. ते टोकाची भूमिका घेणारे नेते नाहीत. मात्र, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात टाकावे ही त्यांची एकमेव मागणी आहे. शिवाय गोपीनाथ मुंडेंनी त्यांना मानसपुत्र मानल्याने पंकजा मुंडेंच्या शब्दाबाहेर ते जाणार नाहीत याची खात्री भाजप नेत्यांना आहे. शेटटी यांच्यामागे शेतकरी वर्ग आहे. शेट्टींमागे सर्व समाजातील शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे जानकर व शेटटींच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाड पाडण्याचे भाजपचे स्वप्न आहे.
पुढे वाचा, जानकर व शेट्टींचे भाजपऐवजी शिवसेनेसोबत जाणे कसे हिताचे आहे...