आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP State President Devendra Fadanvis News In Marathi, Mumbai

‘दादा’गिरी: आठ वर्षांत दोन्ही पंचवार्षिक योजना तयारच झाल्या नाहीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नियोजन आयोगाला अप्रत्यक्षरीत्या बासनात गुंडाळून ठेवणार्‍या आणि विकासाच्या गप्पा मारणार्‍या राज्यातील सत्ताधार्‍यांनी विकासात महत्वाची भूमिका बजावणार्‍या पंचवार्षिक योजनाच आठ वर्षे उलटूनही तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अकरावी योजना तयार असल्याचे दावे करणार्‍या आयोगाने या योजनेची मुदत उलटून जाईपर्यंत राज्य विधिमंडळात ही योजना सादर केली नाही, तर बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी सुरू होऊन दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही योजना तयार करण्याचे कामही सुरू झालेले नाही.

नियोजन प्रक्रियेचे महत्त्व : विकासाचे धोरण आखायचे, मग नियोजन करायचे आणि त्यानुसार अर्थसंकल्पात नियतव्यय घोषित करून काम पार पाडायचे, अशी साधारणपणे राज्य सरकारची कार्यपद्धती असते. दीर्घकालीन विकासासाठी पाच वर्षांच्या नियोजनाचे रशियन मॉडेल आपण 1952 मध्ये स्वीकारले आहे. विविध विभागांचे पाच वर्षांचे उद्दिष्ट ठरवून ते गाठण्याचा प्रयत्न करणे हा या पंचवार्षिक योजनेचा मूळ उद्देश असतो. पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजन आयोगाने विकासाचा प्राधान्यक्रम ठरवल्यानंतर त्या आधारे अर्थखात्याला आपल्याकडे असलेल्या निधीचा विनियोग करता येतो. तसेच केंद्राकडून विविध प्रकल्पांसाठी निधीची मागणी करता येते. 2006 ते 2011 या काळात राज्यात 11 वी पंचवार्षिक योजना बनवून तिला विधिमंडळाची मान्यता घेऊन त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूद करायला हवी होती. 11 वी पंचवार्षिक योजना तयार असल्याचे भासवण्यासाठी ही योजना आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ही योजना विधिमंडळात मान्यतेसाठी कधी सादरच करण्यात आली नाही. त्यामुळे योजना तयार असली तरी एकूण नियोजन आणि विकास प्रक्रियेत काहीही अर्थ नव्हता. 2012 पासून राज्याच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी सुरू झालेला असला तरी 12 व्या योजनेचा अजूनही पत्ता नाही. त्यामुळे सध्या राज्याचा गाडा हा ‘अंदाज पंचे दाहो दशे’ अशा पद्धतीने सुरू आहे.

नियोजनच रामभरोसे : रत्नाकर महाजन यांच्यानंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्यापासून या आयोगाची वाट लागली आहे. नियोजन प्रक्रियेचा सूक्ष्म अभ्यास नसलेले आणि त्याचे महत्व न जाणणारे नेते केवळ राजकीय सोयीसाठी नेमण्यात आले. बाबासाहेब कुपेकर आणि आता रामराजे निंबाळकर यांना केवळ मंत्रीपद देता येत नाही म्हणून उपाध्यक्ष पदी वर्णी लावून त्यांना लाल दिवा देण्यात आला.
विचारून सांगतो : रामराजे
निंबाळकर यांनी या पदाची सूत्रे स्वीकारून एक वर्ष झाल्यानंतरही पंचवार्षिक योजना तयार आहे की नाही, याचे साधे ज्ञानही नाही. यावरून या आयोगाचा कराभार कसा रामभरोसे सुरू आहे, याची कल्पना येते. ‘मी नुकताच कार्यभार सांभाळल्यामुळे बारावी योजना अजून का तयार नाही हे आमच्या सदस्य सचिवांना विचारून सांगतो,’ असे रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाबाबत
बोलताना सांगितले.

11 वी योजना सादरच झाली नाही :फडणवीस
11 वी पंचवार्षिक योजना वेबसाइटवर टाकून ही योजना तयार असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, वारंवार मागणी करूनही ही योजना कधीच विधिमंडळासमोर सादर करण्यात आली नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.