आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामतांच्या घरासमोर भाजपचे आंदोलन; स्मृती इराणी यांच्यावरील शेरेबाजीचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत रविवारी भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार गुरुदास कामत यांच्या चेंबूर येथील घरासमोर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, ‘असल्या फुटकळ आंदोलनाने भाजप आमचा आवाज दाबू शकत नाही,’ अशी प्रतिक्रिया देत कामत यांनीही प्रतिआव्हान दिले.
मुंबईतील माजी खासदार आणि सध्या राजस्थानचे प्रभारी असलेल्या गुरुदास कामत यांनी राजस्थानातील पाली येथील एका सभेत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांचा उल्लेख ‘कामवाली बाई' असा केला होता. या वक्तव्याने संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी दोनच्या सुमारास कामत यांच्या चेंबूर येथील घरासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. इतकेच नव्हे तर कामत यांच्या बंद घराच्या गेटवरून आत घुसत त्यांच्या नामफलकाला काळेही फासले.

दरम्यान, या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना कामत म्हणाले, ‘घरात आम्ही कोणीच नसताना भाजपने केलेला हा प्रयत्न हास्यास्पद अाहे. अर्धशिक्षित असलेल्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात भाष्य करताच आंदोलन करणारे भाजप कार्यकर्ते सुषमा स्वराज आणि वसुंधराराजे यांच्यासारख्या त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांवरील टीकेविरोधात मात्र आंदोलन करत नाहीत याचे आश्चर्य वाटते. याचा अर्थ सध्या भाजपमध्ये स्वराज आणि राजे यांच्यापेक्षा स्मृती इराणी यांचे स्थान वरचे आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला. आमच्याविरोधात आंदोलने करण्यात वेळ घालवण्यापेक्षा जनतेला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी काम करा, असा खोचक सल्लाही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला. तसेच भविष्यात आंदोलने केल्यास काँग्रेसच्या वतीनेही भाजपच्या नेत्यांच्या घरांसमोर आंदोलने केली जातील, असा इशाराही कामत यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...