आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपसोबत सत्तेत जाण्याबाबत शिवसेनेत पडले दोन गट, काहींना आस लाल दिव्याची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘सत्ता जाते कुठे, ती येणारच’ असे जाहीर वक्तव्य करून शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्याचे संकेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी शिवसेनेला सरकारमध्ये घेतले जाईल, असे स्पष्ट शब्दांत सांगितल्याने शिवसेनेतील सत्तालोलूप नेत्यांमध्ये मंत्रिपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे, शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांचा मात्र आता सत्तेत जाण्यास विरोध आहे. आजवर आपल्याला खेळवत आलेल्या भाजपला आता चांगलाच धडा शिकवू, आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका बजावून मध्यावधीत आणखी चांगले यश मिळवू, या भूमिकेवर हे काही जुने नेते ठाम आहेत. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी होणार नाही, असे शिवसेनेतील कोकणातील एका ज्येष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. तर दुसरीकडे, ‘पक्षाने आधी शिवसैनिकांची भावना समजून घ्यावी, मगच योग्य निर्णय घ्यावा,’ असे सांगत माजी विराेधी पक्षनेते रामदास कदम यांनीही भाजपविरोधी नाराजी बोलून दाखवली.

आता चालेल आमची मर्जी
शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवू इच्छिणार्‍या भाजपला आता हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर मात्र प्रेम दाटून आले आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे पुरती बदनामी झालेल्या दुष्काळाच्या प्रश्नावर शिवसेनेसारख्या आक्रमक विरोधकांशी सामना करण्याच्या भीतीपोटी भाजपने शिवसेनेला सत्तेचे निमंत्रण दिल्याचे सांगितले जाते. मात्र आजवर आम्हाला झुलवत ठेवलेल्या भाजपला आता आम्ही मागू ती मंत्रिपदे द्यावीच लागतील, अशी परखड भूमिका एका नेत्याने बोलून दाखवली.