आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची कोंडी करण्याचे भाजपचेही डावपेच, एका नेत्यानेच केली माहिती उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेशी वाटाघाटी सुरू ठेवून आवाजी मतदानाने विश्वास ठराव मंजूर करून घेणा-या भाजपने शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद दिले खरे, परंतु आता शिवसेना आपल्या बाजूने राहणार की विरोध करणार हे सिद्ध करण्यासाठी भाजप अनोखी खेळी करणार असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपतील एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना याबाबतचे सूतोवाच केले. त्यांच्या मते, सत्तेत योग्य वाटा मिळाला नाही तर विरोधी पक्ष नेतेपदही हातचे जाईल म्हणूनच शिवसेनेने घाई केली. शिवसेना आता विरोधात आहे खरी, परंतु आम्ही लवकरच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या घोटाळ्यांची चौकशी करणार आहोत. त्या वेळेस राष्ट्रवादी आमच्यावर अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी होईल, असे हा नेता म्हणाला.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली, तर शिवसेना भाजपला साथ देईल की विरोधात जाईल याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल. विश्वास ठरावाच्या वेळी त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली तर ते राष्ट्रवादीबरोबर आहेत आणि भाजपला पाठिंबा दिला, तर ते आमच्याबरोबर आहेत हे सिद्ध होईल. त्यामुळे शिवसेनेने काय करायचे याचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, असे हा नेता म्हणाला.
राष्ट्रवादीला देणार विरोधी पक्षनेतेपद
भाजपच्या अनोख्या राजकारणामुळे राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते. काँग्रेसचे काही आमदार फोडून त्यांना भाजपच्या तिकिटांवर निवडून आणून काँग्रेसचे संख्याबळ कमी केले जाणार आहे. नागपूर अधिवेशनात वा त्यापूर्वी शिवसेना सत्तेत सहभागी होईल आणि राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरणार असल्याने विरोधी पक्षनेतेपद आपोआपच राष्ट्रवादीच्या पारड्यात पडेल.
"शिवसेनेची भाजपशी फिक्सिंग' ‘विधानसभेत विश्वासमत प्रस्ताव मांडला, तेव्हा शिवसेनेचे नेते सदनाबाहेर का गेले होते,’ असा सवाल ज्येष्ठ पत्रकार तथा शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेना आमदार सभागृहाबाहेर गेल्याचे सांगितले होते. बुधवारच्या विश्वासदर्शक ठरावाची ‘फिक्सिंग’ झाली होती काय, अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली. ‘ठरावावर मतदान व्हावे असे चारपैकी तीन पक्षांना वाटत होते. भाजपला मात्र मतविभागणी नको होती, कारण ती त्यांना अडचणीची ठरू शकत होती. शिवसेनेने मतविभागणीची मागणी केली असली तरी ठराव संमत झाला त्या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे व अन्य ज्येष्ठ आमदार सभागृहाबाहेर का गेले होते,’ असा सवालही राऊत यांनी विचारला आहे.