आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून होणा-या अवहेलनेस उत्तरादाखल भाजपची मुंबईत पोस्टरबाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेच्या मुखपत्रातून सतत होणारी अवहेलना सहन न करता जशास तसे उत्तर देण्याचे भाजप नेत्यांनी ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून विकासकामांचे श्रेय घेणारी 200 होर्डिंग्ज भाजपने मुंबईत लावली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


वीस वर्षांपासून शिवसेना-भाजपची युती आहे. परंतु शिवसेनेबरोबर नेहमीच फरपट होते, असा भाजप नेत्यांचा आरोप आहे. शिवसेना नेत्यांनी कितीही अन्याय केला तरी याआधी भाजप नेते गप्प बसत असत. परंतु आता या पक्षातील तरुण नेत्यांनी शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे.


मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच आमदार आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनी पक्षाची जाहिरात करणारे 200 पेक्षा जास्त होर्डिंग्ज शहरात लावले आहेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर मुंबईच्या विकासाचे शिवसेना वा युती सरकारला न देता भाजपने स्वत:कडे घेतले आहे.


काय आहेत बढाया?
मुंबईत 55 उड्डाणपूल भाजपनेच बांधले. वांद्रे वरळी सी लिंकची उभारणी, व्हीटी स्टेशन, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव द्यायला भाग पाडले असा प्रचार केला जात आहे. इतकेच नव्हे तर भाजप नसता तर मुंबईची अवस्था बिकट झाली असती अशी घोषवाक्येही होर्डिंग्जवर आहेत. विशेष म्हणजे अनेक होर्डिंग्ज उद्धव ठाकरेंचे निवासस्थान व शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या वांद्रे, खार आणि सांताक्रुझ विभागात लावले आहेत.