आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Votes Increases Than Shiv Sena Nationalist, Modi On Frantrunner, Divya Marathi

भाजपच्या वाढत्या मतांना शिवसेना- राष्ट्रवादीचा फटका, आता भिस्त मोदींवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरुवातीच्या टप्प्यात भाजप व राष्ट्रवादीत खरी लढत होण्याची चिन्हे होती. मात्र, आता शिवसेना व काँग्रेसही चुरस वाढवतील, असे दिसते. त्यामुळे विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता. वाचा महाराष्‍ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पक्षीय राजकारणाविषयी...
* मुंबई शहर
सर्वच पक्षांचे टार्गेट शिवसेना
मुंबई शहरात १० मतदारसंघ आहेत. यापैकी दोन ठिकाणी भाजपविरुद्ध काँग्रेस, दोन ठिकाणी काँग्रेसविरुद्ध शिवसेना, तर दोन जागांवर शिवसेनाविरुद्ध मनसे लढती होतील. धारावी आणि सायनमध्ये काँग्रेसविरुद्ध शिवसेना, वडाळ्यात काँग्रेसविरुद्ध इतर पक्ष अशी लढत असली, तरी या जागा काँग्रेसला अनुकूल आहेत. शिवडी व माहिममध्ये शिवसेनाविरुद्ध मनसे लढत असेल. वरळी, भायखळ्यात पंचरंगी लढत होईल. मलबार हिलमध्ये भाजपला चांगले वातावरण आहे. कुलाबा आणि मुंबादेवीत भाजपविरुद्ध काँग्रेस लढत होईल. मुंबई उपनगरात २६ मतदारसंघ आहेत. बोरिवलीत भाजपचे विनोद तावडे यांच्या विरोधात शिवसेनेने डमी उमेदवार दिल्याने त्यांचे पारडे जड आहे. दहिसरमध्ये शिवसेनेला मनसे आणि काँग्रेसचे आव्हान आहे. मागाठाणेमध्ये भाजपची लढत शिवसेनेशी आहे. कांदिवली पूर्व येथे अतुल भातखळकर यांना शिवसेनेच्या अमोल कीर्तिकर यांचे आव्हान असेल. चारकोपमधून भाजपचे योगेश सागर यांना अनुकूल वातावरण आहे. अंधेरीमधून शिवसेनेचे रमेश लटके आणि आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्यात लढत आहे. भाजप नेते आशिष शेलार वांद्रे (प.), कृपाशंकर सिंग (कलिना) आणि नसीम खान (चांदिवली) येथून निवडणूक लढवत आहेत. विलेपार्ले (पू.) मधून कृष्णा हेगडे यांना भाजपचे पराग अळवणी टक्कर देऊ शकतात. अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड दिसून येते.
* ठाणे
शिवसेनेसह मनसेही असेल शर्यतीत
ठाण्यात सेनाविरुद्ध राष्ट्रवादी, आवळा माजिवडा - सेना, मनसे, राष्ट्रवादीत लढत होईल. कोपरी पाचपाखाडीत शिवसेनेचे वर्चस्व राहील. मुंब्रात राष्ट्रवादी, काँग्रेस, एमआयएम अशी तिरंगी लढत. ऐरोली व बेलापुरात राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना, भिवंडी प.मध्ये सपाविरुद्ध राष्ट्रवादी, पूर्वमध्ये काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी, मुरबाडमध्ये भाजपला काँग्रेसचे आव्हान, डोंबवलीत भाजप-सेना, मनसे, कल्याण ग्रामीण, पूर्व, पश्चिममध्ये शिवसेना, भाजप, मनसेत लढत होईल.
* पालघर
स्थानिक आघाडीचे सेना-भाजपला आव्हान
वसईत शिवसेनेने पाठिंबा देऊनही जनआंदोलन पक्षाचे विवेक पंडित यांना वसई विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांचे आव्हान असेल. नालासोपरामधून क्षितिज ठाकूर यांना पुन्हा शिवसेनेचे शिरीष चव्हाण व भाजपचे राजन नाईक यांनी आव्हान दिले आहे. बोईसरला विलास तरे (बहुजन विकास आघाडी), कमलाकर दळवी (शिवसेना), जगदीश धुरी (भाजप), तर पालघरला कृष्णा घोडा (शिवसेना) विरुद्ध मनीषा निमकर (विकास आघाडी) असा सामना होणार आहे.

* रत्नागिरी
शिवसेना- राष्ट्रवादीत लढत
राष्ट्रवादीचे मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या तंबूत दाखल झाल्याने रत्नागिरी मतदारसंघातील चित्र पालटले आहे. राजापूरमधून शिवसेनेच्या राजन साळवींना फारशी ताकद लावावी लागणार नाही. चिपळूणमधून शिवसेनेचे सदानंद चव्हाण विरुद्ध राष्ट्रवादीचे शेखर निकम, गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे भास्कर जाधव विरुद्ध भाजपचे विनय नातू रिंगणात आहेत. दापोलीमधून शिवसेनेचे सूर्यकांत देसाई यांना राष्ट्रवादीच्या संजय कदम यांचे आव्हान असेल.

* सिंधुदुर्ग
काँग्रेस- शिवसेनेत खरी लढत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्व कायम राखण्यासाठी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना झुंजावे लागणार आहे. राणे कुडाळ मतदारसंघातून उभे असून त्यांच्याशी शिवसेनेच्या वैभव नाईक यांची लढत होईल. सावंतवाडीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले दीपक केसरकरांसमोर सुरेश दळवी (राष्ट्रवादी), परशुराम उपकरकर (मनसे), बाळा गावडे (काँग्रेस) हे असतील. कणकवली देवगडमधून भाजपचे प्रमोद जठारांना काँग्रेससचे नीलेश राणे यांचे आव्हान असेल.

* रायगड
शिवसेना- शेकापमध्ये लढत
रायगड जिल्ह्यात शेकापने या वेळी राष्ट्रवादीची साथ घेतली आहे. कर्जतमध्ये सुरेश लाड, तर श्रीवर्धनमध्ये अवधूत तटकरे या राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात जिंकून न येणारे उमेदवार दिलेले आहेत. पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर विरूद्ध शेकापचे बळीराम पाटील, उरणला शेकापच्या विवेक पाटील यांना शिवसेनेच्या मनोज भोईर यांचे आव्हान आहे. पेणमध्ये शेकापच्या धैर्यशील पाटील यांच्यासमोर रवी पाटील (काँग्रेस), किशोर जैन (शिवसेना) हे आहेत.

* पुणे
वर्चस्वासाठी ‘राष्ट्रवादी’चा संघर्ष
पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघ आहेत. बारामतीत अजित पवारांचा मार्ग सुकर आहे. शिवाजीनगरात काँग्रेसचे पारडे जड. कसब्यात भाजप आमदार गिरीश बापट यांना काँग्रेसचे आव्हान. कोथरूडमध्ये शिवसेना व भाजपत लढत होईल. पर्वतीमध्ये भाजपला काँग्रेस व राष्ट्रवादीशी झुंजावे लागेल. हडपसर आणि पुरंदरमध्ये शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीशी सामना आहे. जुन्नर, भोसरी, पिंपरी, वडगाव व आंबेगावात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना संघर्ष आहे. शिरूरमध्ये

* सांगली
काँग्रेस-राष्ट्रवादीची भाजपशी लढत
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ असून सांगली, मिरज-कडेगाव येथे काँग्रेस विरुद्ध भाजप; शिराळा, जत, तासगाव-कवठे महांकाळ येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशा सरळ लढती, तर इस्लामपुरात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस. खानापूरला काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत.जयंत पाटील, पतंगराव कदम, आर. आर. पाटील या तीन दिग्गज मंत्र्यांच्या लढतीकडे लक्ष आहे. जयंत पाटलांविरोधात विरोधक एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

* सातारा
राष्ट्रवादीला काँग्रेसचे आव्हान
सातारा जिल्ह्यात एकूण ८ मतदारसंघ आहेत. कराड उत्तर, वाई, फलटण, कोरेगाव येथे राष्ट्रवादीला काँग्रेसच्या उमेदवारांचे आव्हान असेल. कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात आहेत. त्यांना काँगेसचे बंडखोर विलासराव पाटील- उंडाळकर, भाजप उमेदवाराला कडवी झुंज द्यावी लागणार आहे. माण येथे काँग्रेस-राष्टवादी व शिवसेनेची लढत रंगेल. सातारा येथे राष्ट्रवादी- भाजप यांच्यात लढत होईल.

* कोल्हापूर
काँग्रेस- राष्ट्रवादीची ‘युती’
कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी या पाच प्रमुख पक्षांमध्ये लढती रंगतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काही ठिकाणी सोयीने माघार घेतली आहे. चंदगड, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी आणि कोल्हापूर उत्तर या ठिकाणी चौरंगी लढत होईल. कागल, राधानगरी येथे राष्ट्रवादी- शिवसेनेत, करवीरमध्ये काँग्रेस-शिवसेनेमध्ये लढत होईल. दक्षिणमधून काँग्रेसविरुद्ध भाजप लढत होईल.

* सोलापूर
भाजप - राष्ट्रवादीत लढत
११ पैकी पाच मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप व स्वाभिमानी, काँग्रेस, शिवसेना अशी चौरंगी लढत आहे. करमाळा, माढा, बार्शी, पंढरपूर, मोहोळमध्येही चौरंगी लढत. सोलापूर शहर उत्तर, शहर मध्यमध्ये सहा उमेदवारांमध्ये लढत आहे. माकप, एमआयएमचे उमेदवार काँग्रेसचे डोकेदुखी ठरतील. तीन ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध स्वाभिमानी, भाजपा, शिवसेना अशी तिरंगी तर दक्षिण सोलापूर मतदारसंघात सात प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहे.

* औरंगाबाद
राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये काट्याची लढत
औरंगाबाद- एकूण ९ मतदारसंघ असून यातील तीन औरंगाबाद शहरातील आहेत. शहरालगत फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, पैठण हे मतदारसंघ आहेत. सर्व मतदारसंघांत बहुरंगी लढती लढती होणार आहे. अपक्ष उमेदवार प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. तरी प्रमुख लढत मोठ्या पक्षांमध्ये होणार आहेत. जिल्ह्यात तीन ठिकाणी राष्ट्रवादी, दोन ठिकाणी भाजप, तर दोन शिवसेना, तर एका जागेवर काँग्रेसचे पारडे जड मानले जात आहे.

* बीड
राष्ट्रवादीविरुद्ध भाजपचे आव्हान
बीड जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. परळीत भाजपविरुद्ध राष्ट्रवादी म्हणजेच पंकजा मुंडेंविरुद्ध धनंजय मुंडे अशी होत आहे. बीडमध्ये पंचरंगी सामना रंगणार आहे. आष्टीत राष्ट्रवादीविरुद्ध भाजप. गेवराईत पाचही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत, परंतु दोन्ही पंडित एकत्र आल्याने राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच लढत होणार आहे. केजमध्ये राष्ट्रवादीसमोर भाजपचे आव्हान आहे. माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच खरी लढत होईल.

* जालना
भाजप-राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये लढत
जालना जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. जालन्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. बदनापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि काँग्रेस अशी बहुरंगी लढत होईल. भोकरदनमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीत खरी चुरस आहे. घनसावंगीत राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपेंपुढे भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसेचे आव्हान असेल. परतूरमध्ये काँग्रेसचे सुरेश जेथलिया आणि भाजपचे बबनराव लोणीकर यांच्यात थेट लढत होणार आहे.

* नांदेड
काँग्रेसची लढत राष्ट्रवादी, भाजपशी
नांदेड जिल्ह्यात एकूण ९ मतदारसंघ आहेत. काँग्रेस–राष्ट्रवादीत, काँग्रेस-भाजप, शिवसेना-भाजप अशा लढती तीन मतदारसंघांत पाहायला मिळतील. नांदेड दक्षिण मतदारसंघात चौरंगी. नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण मतदारसंघात एमआयएम काँग्रेससाठी डोकेदुखी ठरेल. लोहा मतदारसंघात प्रा. मनोहर धोंडे यांच्या बंडखोरीचा फटका शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकर यांना बसू शकतो. भोकरमधून अमिता चव्हाण- डॉ. माधव किन्हाळकर यांच्यात लढत होतील.

* परभणी
मतविभाजनाचा फटका काँग्रेसला
परभणी जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. पाथरीत काँग्रेसचे सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्रानी, शिवसेनेच्या मीरा रेंगे यांच्यात लढत आहे. जिंतूरमध्ये खरी लढत राष्ट्रवादीचे विजय भांबळे आणि काँग्रेसचे रामप्रसाद बोर्डीकरांत होईल. गंगाखेडमध्ये सीताराम घनदाट, राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे, यांच्यात होईल. परभणीत काँग्रेसचे इरफान उर रहमान खान, राष्ट्रवादीचे प्रताप देशमुख, भाजपचे आनंद भरोसे, शिवसेनेचे राहुल पाटील हे रिंगणात आहेत.

* हिंगोली
काँग्रेसविरुद्ध भाजप, शिवसेनेची लढत
या मतदारसंघात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे अशी पंचरंगी लढत होत असून काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख लढत सध्या तरी दिसत आहे. कळमनुरीत प्रमुख लढत काँग्रेस व शिवसेनेत होणार आहे. वसमतमध्ये प्रमुख लढत राष्ट्रवादी- शिवसेनेत होईल. जातीय समीकरणांचा विचार केल्यास त्यांचा भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता आहे. या स्थितीत काट्याच्या लढती रंगणार आहे.

* लातूर
लातुरात काँग्रेसला भाजपचे आव्हान
लातूर शहरमध्ये काँग्रेसचे अमित देशमुख आणि भाजपचे शैलेश लाहोटी. लातूर ग्रामीणमध्येही काँग्रेसचे त्र्यंबक भिसे व भाजपचे रमेश कराड. औशामध्ये काँग्रेसचे बसवराज पाटील आणि शिवसेनेचे दिनकर माने यांच्यात टक्कर होईल. निलंग्यात काँग्रेसचे अशोकराव व भाजपचे संभाजीराव या निलंगेकर काका- पुतण्यात सामना रंगेल. उदगीरमध्ये भाजपचे सुधाकर भालेराव- राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांच्यात. अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीची अपक्षाशी लढत होईल.

* उस्मानाबाद
शिवसेना दोन, राष्ट्रवादी एका जागी वरचढ
उस्मानाबाद जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी उस्मानाबादेत चार पक्षांत होईल, मात्र राष्ट्रवादीला फायदा शक्य. उमरगा, तुळजापूरमध्ये प्रमुख पाच पक्षांमध्ये लढत अटळ आहे. तुळजापुरात काँग्रेस, तर उमरग्यात शिवसेनेचे पारडे जड मानले जात आहे. परंड्यात शिवसेना, रासप, राष्ट्रवादी या पक्षांमध्ये तिरंगी लढत आहे. तुळजापुरातील भाजप- शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी माघार घेतल्याने बंडखोरी टळली आहे. त्यामुळे मतविभाजन टळले आहे.

* अहमदनगर
मतविभाजनाचा फायदा प्रस्थापितांना
अहमदनगर जिल्ह्यात तब्बल १२ मतदारसंघ आहेत. यात १३८ उमेदवार नशीब आजमावताहेत. नऊ मतदारसंघांत चौरंगी व तीन मतदारसंघांत पंचरंगी लढती होतील. नेवासे, शेवगाव-पाथर्डी व श्रीरामपूर येथे मनसेचे उमेदवार रिंगणात उतरल्याने पंचरंगी लढती होतील. पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे माधव लामखडे, विश्वनाथ कोरडे यांनी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार सुजित झावरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

* नाशिक
शिवसेना- राष्ट्रवादीत लढत
जिल्ह्यात एकूण १५ मतदारसंघ आहेत. त्यापैकी पाच मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, तीन मतदारसंघांत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, दोन मतदारसंघांत भाजप विरुद्ध काँग्रेस, तर प्रत्येकी एका मतदारसंघात शिवसेना विरुद्ध मनसे, शिवसेना विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशा लढती होतील. नाशिक पश्चिममध्ये बंडखोरीमुळे सेना उमेदवाराला, तर चांदवडमध्येही बंडखोरीचा फटका पक्षांना बसेल. इगतपुरीत सेना-मनसेच्या टक्क्यात घट होऊ शकते.

* जळगाव
शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीत लढती
जळगाव जिल्ह्यातील ११ मतदारसंघांपैकी जळगाव शहर, रावेर, भुसावळ, अमळनेर, मुक्ताईनगर या पाच मतदारसंघांमध्ये पंचरंगी लढती रंगणार आहेत. जळगाव ग्रामीण, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल या ठिकाणी चौरंगी, तर जामनेरमध्ये भाजप- राष्ट्रवादी यांच्यात सरळ लढत होईल. तीन ठिकाणी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, चार मतदारसंघांत भाजप-राष्ट्रवादी, एका िठकाणी भाजप-काँग्रेस, तीन ठिकाणी शिवसेना- भाजप यांच्यात सामने रंगतील.

* धुळे
विद्यमान आमदारांना कडवे आव्हान
धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील धुळे शहरामध्ये पंचरंगी, धुळे ग्रामीण व शिंदखेडामधून चौरंगी, साक्रीत तिरंगी आणि शिरपुरात सरळ लढती होणार आहेत. उमेदवारांची संख्या वाढल्याने सद्य:स्थितीत राजकारण्यांसह नागरिकांना अंदाज बांधणे कठीण आहे. समोरासमोर एक नव्हे, तर तीन ते चार तुल्यबळ उमेदवार उभे राहिले आहेत. भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे आपापल्या पद्धतीने कस लावत आहेत.
* नंदुरबार
काँग्रेसला भाजपचे कडवे आव्हान
नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. सर्वच ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत. यात नंदुरबार, नवापूर व अक्कलकुवा या ठिकाणी पंचरंगी लढती होतील. शहादा मतदारसंघात तिरंगी लढत होईल. या ठिकाणी विजयासाठी राष्ट्रवादीला थेट काँग्रेसशीच झुंजावे लागणार आहे. गावित बंधूंमुळे निवडणुकीत रंगत आली आहे, तर माजी मंत्री सुरूपसिंग नाईकही रिंगणात उतरले आहेत.

* अकोला
‘भारिप’ देणार प्रस्थापितांना आव्हान
पाच मतदारसंघांपैकी अकोला पश्चिम, अकोट व मूर्तिजापूर या तीन ठिकाणी तिरंगी, तर अकोला पूर्व, बाळापूर या दोन ठिकाणी पंचरंगी लढती होतील. अकोला पश्चिममध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, पूर्वमध्ये भारिप-बमसं विरुद्ध शिवसेना, बाळापूर, मूर्तिजापुरात भारिप-बमसंविरुद्ध भाजप, तर अकोटमध्ये काँग्रेसविरुद्ध भाजप. अकोला पश्चिममध्ये काँग्रेसला, तर पूर्वमध्ये भारिपला, बाळापुरात भाजप व काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.

* बुलडाणा
तिरंगी-चौरंगी लढती
बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव-जामोद, मलकापूर या सात मतदारसंघांत यापैकी खामगाव, चिखली, बुलडाणा येथे चौरंगी लढत होणार आहेत. जळगाव जामोद येथे तिरंगी लढती रंगतील. मलकापूर, मेहकर येथेही तिरंगी लढत पाहायला मिळेल. बुलडाणा जिल्ह्यात शिवसेना उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे शिवसेना उमेदवारास फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांकडून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

* वाशीम
काँग्रेस- राष्ट्रवादीसमोर आव्हान
वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा व रिसोड या तीनही मतदारसंघांत चौरंगी लढतीचे चित्र आहे. वाशीममध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, कारंजात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अपक्ष, तर रिसोडमध्ये काँग्रेसविरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. वाशीममध्ये काँग्रेस उमेदवाराच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला फटका बसणार आहे, तर कारंज्यात राष्ट्रवादीच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे मोठे आव्हान आहे.

* अमरावती
बहुरंगी लढतीमुळे संभ्रम कायम
अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी धामणगाव, बडनेरा, अमरावती, दर्यापूर, मेळघाट, अचलपूर या सहा मतदारसंघांत चौरंगी सामना रंगणार आहे. तर तिवशात पंचरंगी, तर मोर्शीत दोन पक्षात थेट लढत होतील. अचलपूर मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस उमेदवाराला आव्हान आहे, तर दर्यापुरात शिवसेनेचे दोन बंडखोर काँग्रेस व राष्ट्रवादीतून लढत आहेत. शिवसेनेच्या विद्यमान उमेदवाराला याचा फटका बसू शकतो.

* नागपूर
राष्ट्रवादी-शिवसेनेला बंडखोरांचे आव्हान
नागपूर पूर्व ,पश्चिम, उत्तर, दक्षिण-पश्चिम, मध्य, कामठी व उमरेड येथे भाजपविरुद्ध काँग्रेस असा थेट सामना राहील. काटोल, नागपूर दक्षिण, हिंगणा आणि रामटेक या मतदारसंघांत शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत पाहायला मिळेल. दक्षिण-पश्चिम नागपुरात भाजप, मध्य नागपुरात काँग्रेस, तर दक्षिण नागपुरात राष्ट्रवादी व शिवसेनेला बंडखोरांचे आव्हान राहणार आहे.

* यवतमाळ
काँग्रेस-राष्ट्रवादी, तर भाजप-सेनेत लढत
यवतमाळ, वणी, राळेगाव, आर्णी, दिग्रस, पुसद, उमरखेड या सात मतदारसंघांपैकी उमरखेड व आर्णी मतदारसंघांत थेट लढत रंगणार आहे. यवतमाळ, दिग्रस येथे चौरंगी, पुसद येथे तिरंगी, तर वणी येथे बहुरंगी लढत होणार आहे. वणी येथे काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी, राळेगावात भाजप विरुद्ध शिवसेना, यवतमाळ, दिग्रस, आर्णी व उमरखेडमध्ये भाजपविरुद्ध काँग्रेस असा सामना पाहायला मिळेल. यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

* वर्धा
काँग्रेस-राष्ट्रवादीत लढत रंगणार
वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट या चार मतदारसंघांपैकी देवळी व आर्वी येथे काँग्रेस व भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये थेट लढत होणार आहे. हिंगणघाटात तिरंगी, तर वर्धेत पंचरंगी लढत होईल. महात्मा गांधींच्या विचारांना मानणा-या वर्धा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, तर हिंगणघाटात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. वर्धेत बंडखोर उमेदवाराने आव्हान कायम ठेवल्याने भाजपला फटका बसणार आहे.
भंडारा
बसप देणार शिवसेनेशी लढत
भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, साकोली हे तीन मतदारसंघ आहेत. यापैकी भंडा-यात चौरंगी, तुमसरमध्ये तिरंगी, साकोलीत थेट लढत होणार आहे. भंडा-यात शिवसेना विरुद्ध बसप, तुमसरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, साकोलीत काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत असून तुमसरमध्ये भाजपला बंडखोरीचा फटका बसणार आहे. बहुरंगी लढतीमुळे या जिल्ह्यातील निकालाचे चित्रही उमेदवारी मागे घेतल्यानंतर स्पष्ट होत नाही.

* गोंदिया
चौरंगी लढत रंगणार
गोंदिया, अर्जुनी मोरगाव, तिरोडा, आमगाव या चार मतदारसंघांपैकी आमगाव येथे थेट लढतीचे चित्र असून उर्वरित चारही ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र आहे. पैकी गोंदियात काँग्रेसविरुद्ध शिवसेना, मोरगावात भाजप विरुद्ध शिवसेना, तिरोड्यात राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, तर आमगाव येथे काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत होईल. तिरोड्यात राष्ट्रवादीला, मोरगाव मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीचा फटका बसू शकतो.

* चंद्रपूर
भाजप -काँग्रेसमध्ये लढत
चंद्रपूर, राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, बल्लापूर या सहा मतदारसंघांत चंद्रपूर येथे चौरंगी, राजुरा, ब्रम्हपुरी, वरोरा येथे ितरंगी, तर बल्लारपूर व चिमूर येथे थेट लढती पाहायला मिळतील. यापैकी चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, ब्रह्मपुरी या चार मतदारसंघांत भाजपचा थेट काँग्रेसशी सामना आहे. राजु-यात काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत राहील. या िजल्ह्यात बंडखोरीचा विशेष परिणाम जाणवला नसल्याचे माघारीअंती स्पष्ट झाले.
गडचिरोली
भाजपचा लढा राष्ट्रवादीशी
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा राजकारणापेक्षा तेथील कारवायांसाठीच जास्त कुप्रसिद्ध मानला जातो. जिल्ह्यात गडचिरोली, अहेरी व आरमोरी हे तीन मतदारसंघ आहेत. यापैकी अहेरी, आरमोरी येथे तिरंगी, तर गडचिरोलीत चौरंगी लढत होईल. यातील अहेरी व गडचिरोली येथे भाजपचा सामना राष्ट्रवादीशी आहे. आरमोरीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. याही मतदारसंघात बंडखोरीचा प्रभाव जाणवणार नाही.