आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Will Fight Three Of The Four Seats Of The Legislative Council Election

भाजपात सावळा गोंधळ, विधान परिषदेच्या तीन जागांचा तिढा फडणवीसांना सुटेना!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- येत्या 30 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या चार विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप तीन तर शिवसेना एक जागी लढणार आहे. भाजप आपल्या तीन जागांच्या कोट्यात पक्षातील नेत्यांना संधी द्यायची की मित्रपक्षांना स्थान द्यायचे अशा विवंचनेत आहे. दरम्यान, चारही मित्रपक्षांना डावलून आपल्याच पक्षातील नेत्यांना विधान परिषदेवर लावण्याचा विचार भाजप करीत आहे. त्यामुळे आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांची भाजपवरची नाराजी वाढत चालली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशिष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने तर विनायक मेटे यांना अपात्र ठरविल्याने येत्या 30 जानेवारीला विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत आहे. याची अधिसूचना 13 जानेवारीला जाहीर करण्यात आली आहे. तसेच येत्या मंगळवारी ( 20 जानेवारी रोजी) नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेला एक जागा देण्यात आली आहे व त्या जागेवर सेनेकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे नाव निश्चित झाले आहे. तर भाजपला मात्र अद्याप निर्णय करता आलेला नाही. मित्रपक्षांना संधी द्यायची की पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा या विवंचनेत मुख्यमंत्री फडणवीस आहेत.
दरम्यान, भाजपमधील एक गट मित्रपक्षांना अजिबात संधी देऊ नये या मतापर्यंत आला आहे. तर, मित्रपक्षांना डावलल्यास सरकारची प्रतिमा खराब होईल व जनमानसांत चुकीचा संदेश जाईल असे मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. मात्र, भाजपमधील काही मंडळी फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठीच मित्रपक्षांना दूर ठेवण्याची खेळी करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे भाजपने तीन जागांसाठी काहीही निर्णय अद्याप घेतला नाही. तसेच अर्ज भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिले असतानाही याबाबत भाजपमधून कोणीही काहीही बोलताना दिसत नाही.
दरम्यान, भाजपकडून आपल्याला कोणतेही विचारपूस होत नसल्याने मित्रपक्षांत अस्वस्थता आहे. खासदार रामदास आठवले, राजू शेट्टी यांच्यासह महादेव जानकर यामुळे कमालीचे नाराज झाले आहेत. यापुढे माझे सहकारी सदाभाऊ खोत यांना मंत्री बनवावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा भाजपशी चर्चा करणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी घेतली आहे. तर, रामदास आठवले यांनीही भाजपला लेखी कराराची आठवण करून दिली आहे.
आठवले म्हणाले, भाजपच्यावतीने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पक्षाला केंद्रात 1 व राज्यात दोन मंत्रीपदासह महामंडळावर नियुक्त्या करण्याचे लेखी लिहून आश्वासन दिले आहे. आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नसलो तरी भाजपने दिलेल्या शब्दानुसार जागले पाहिजे. 90च्या दशकात जेव्हा मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात सामील झालो होतो तेव्हा पवारांनी पहिल्याच विस्तारात मला स्थान देत कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारचा दोनदा विस्तार झाला पण अद्याप त्यांनी आमच्या कोणत्याही नेत्यांना संधी दिली नाही. याबाबत आणखी जास्त काय बोलणार आम्ही हतबल आहोत तर सत्ता त्यांच्या हातात आहे त्यांनीच योग्य तो निर्णय घ्यायचा आहे असा नाराजी सूर आठवले यांनी लावला आहे.
महादेव जानकर यांनीही याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. भाजप नुसतेच देतो म्हणतो, देत मात्र काहीच नाही. फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळतात की नाही याची आम्ही वाट पाहत आहोत असे जानकर यांनी म्हटले आहे.