आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Will Put Up Its Best ever Performance In LS Polls: Advani News In Marathi

भाजप करणार रेकॉर्डब्रेक कामगिरी - लालकृष्ण अडवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आपली आतापर्यंतची सर्वात चांगली, तर काँग्रेस आतापर्यंतच्या इतिहासातली सर्वात वाईट कामगिरी असेल,’ असा दावा भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रविवारी केला.

बांद्रा भागातल्या नॅशनल कॉलेज आॅडिटोरियममध्ये भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उपस्थितीत भाजप सिंधी सेलची स्थापना करण्यात आली. या वेळी अडवाणी म्हणाले की, ‘1998-99 मध्ये लोकसभेच्या 182 जागा जिंकत भाजपने इतिहास रचला होता. या वेळी मात्र हाही विक्रम मोडीत काढत भाजप दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकेल यात शंका नाही. 1975 च्या आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा त्याहीपेक्षा कमी जागा काँग्रेसला मिळतील. आणि काँग्रेसच्या इतिहासातला हा नीचांक असेल,’ असे भाकीतही त्यांनी वर्तवले.

पक्षाच्याच उमेदवारांचे विस्मरण !
भाजपचे मुंबईतील गोपाळ शेट्टी आणि पूनम महाजन हे दोन उमेदवार उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम भाजप उमेदवार व दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन राव यांच्या मतदारसंघातच आयोजित करण्यात आला होता. तरीही आपल्या संपूर्ण भाषणादरम्यान अडवाणींनी या उमेदवारांच्या नावाचा साधा उल्लेख केला नाही. नंतर आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यक्रम संपता संपता पुन्हा व्यासपीठावर जात ‘मुंबईतील भाजप- शिवसेनेच्या उमेदवारांना मते देऊन विजयी करण्यासाठी कामाला लागावे,’ असे आवाहन केले. राज ठाकरे आणि नितीन गडकरी भेटीवरून सध्या राज्यात भाजप आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला असतानाच अडवाणी यांनी भाजपसोबत शिवसेनेच्या उमेदवारांचीही आठवणीने नोंद घेऊन मित्रपक्षाला खुश करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.