आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्याचाही ‘आदर्श’मध्ये फ्लॅट !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वादग्रस्त ठरलेल्या आदर्श सोसायटी प्रकरणी भाजपने वारंवार राज्य सरकारला धारेवर धरले असताना याच पक्षाचे दक्षिण मुंबई विभागाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सिद्धार्थ गमरे यांचाही याच सोसायटीमध्ये फ्लॅट असल्याकडे समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील नेत्यांनी काहीच माहिती दिलेली नसल्याचे समोर आले आहे. ‘गमरे यांचा फ्लॅट असल्यास चौकशी करू’, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळे भाजपने मुंबईशी संबंधित विविध पदांवर नेमणुका केल्या. गमरे यांनाही दक्षिण मुंबईचे अध्यक्षपद देण्यात आले. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी ही नेमणूक केली असून गमरे यांच्या आदर्शमधील फ्लॅटकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेले दिसते.


दोन वर्षांपूर्वी आदर्श सोसायटीचा वाद ऐन चर्चेत आला असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांचे फ्लॅट सोसायटीमध्ये असल्याच्या कारणावरून भाजपने त्यांच्यावर टीकेचे झोड उठवली होती. माध्यमांचा दबाव आणि विरोधकांची टीका पाहता चव्हाण यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर प्रत्येक वेळी ‘आदर्श’च्या विषयावर संधी मिळेल तिथे भाजपने सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. आता याच सोसायटीच घर असलेल्या कार्यकर्त्याला बढती देऊन अध्यक्षपदी बसवण्याची गरज होती का, असा सवाल कार्यकर्त्यांमधूनच विचारला जात आहे.


गमरेंकडूनही कबुली
गमरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही ‘आदर्श’मध्ये फ्लॅट असल्याचे मान्य केले. मात्र अधिक विचारले असता आपण थोड्या वेळाने फोन करतो असे सांगून फोन बंद केला. फडणवीस यांनीही आपल्याला याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र खरोखरच आदर्शमध्ये फ्लॅट असेल तर त्याची माहिती घेऊन चौकशी करू, असे ते म्हणाले.