आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या काँग्रेसविरोधी आंदोलनाचा मुंबईत फज्जा; मोजकेच नेते उपस्थित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोंधळ घालून संसदेचे कामकाज करू न देणाऱ्या काँग्रेसचा निषेध करत मुंबईत दादर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी जोरदार निदर्शने केली खरी, मात्र मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या आवाहनानंतरही या आंदोलनास मोजक्या नेत्यांची उपस्थिती राहिल्याने भाजपच्या आंदोलनाचा बार फुसका ठरल्याचे स्पष्ट झाले.

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. काँग्रेस देशविरोधी काम करत आहे. जीएसटीसारखे विधेयक रोखून गरीब, दलित, आदिवासी यांना मिळणारे फायदे रोखते आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे देश आणि गरीब जनतेविरोधी काम घराघरात जाऊन जनतेपर्यंत पोहोचवून भाजप काँग्रेसला उघडे पाडेल, असा संकल्प या वेळी शेलार यांनी जाहीर केला.

संसदेचे कामकाज गोंधळामुळे रोखून काँग्रेसने संसदेचा वेळ वाया घालवला. म्हणून भाजपने देशभर काँग्रेसचा निषेध करत आंदोलन सुरू केले आहे. राज्यातही रविवारी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुंबईतील कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वेस्टेशनबाहेर निदर्शने केली. संसदेचे कामकाज रोखून काँग्रेसने देशातील जनतेचा अपमान केला... लोकशाहीचा गळा घोटला.. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा निषेध असो... अशा घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ही निदर्शने केली. या आंदोलनात आमदार कॅप्टन सेलवन, योगेश सागर, राज पुरोहित, अमित साटम, माजी आमदार मधू चव्हाण, अतुल शहा, सहसंघटक सुनील कर्जतकर, उपमहापौर अलका केरकर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा शलाका साळवी, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेश पांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.