(फोटो प्रतिकात्मक)
मुंबई- मुंबईच्या चेंबूर परिसरात असलेल्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स या कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. बॉयलरच्या दुरुस्तीदरम्यान हा स्फोट झाला असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.
या स्फोटात दिलीप पवार, गोविंद कुमार आणि मेहमूद नूर महंमद यांचा मृत्यू झाला, तर सय्यद सादिक, जयशंकर शर्मा, राहुल शिंदे, शशिकांत दळवी आणि रवींद्र कांबळे हे गंभीर जखमी झाले. जखमींना कंपनीच्या परिसरात असलेल्या आरसीएफ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक अखिल घोगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बॉयलर क्रमांक दोनच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना हा स्फोट झाला असून स्फोटाचे नेमके कारण सायंकाळी उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. आरसीएफ ही राष्ट्रीय स्तरावरील कंपनी असून कंपनीत अद्ययावत अग्निशामक यंत्रणा आहे. तरीही स्फोट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.