Home »Maharashtra »Mumbai» Blog By Sukrut Karandikar About Fast For Farmer Issue

Blog : आजार रेड्याला, औषध पखालीला?

सुकृत करंदीकर | Mar 19, 2017, 18:56 PM IST

  • Blog : आजार रेड्याला, औषध पखालीला?
शेतमालाला अपुरा भाव व कर्जबाजारीपणाला कंटाळून राज्यातली पहिली शेतकरी आत्महत्या झाली त्याला आजच्या रविवारी 31 वर्षे होत असल्याचं सांगितलं जात आहे. हीच आत्महत्या पहिली कशावरुन अशी शंकाही व्यक्त होतेय. आत्महत्येचा क्रमांक महत्वाचा नाही. पण या निमित्तानं एक उपक्रम राबवला जातोय. या आत्महत्येची आठवण म्हणून लोकांनी एक दिवस अन्नत्याग करावा, असं आवाहन गेल्या अनेक दिवसांपासून केलं जातंय.

अमर हबीब या उपक्रमाचे प्रणेते आहेत. हबीब यांचं काम मी ऐकून होतो. ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून त्यांची जुजबी ओळख झाली. ‘सोशल मैत्री’ झाली. पुढं पुण्यात पत्रकार भवनात भेटही झाली. हबीब यांच्या हेतुबद्दल शंका नाही. शेतकऱ्यांबद्दलचा त्यांचा कळवळा शुद्ध आणि त्यांची आस्था प्रामाणिक असणार. हबीब यांच्याबद्दल पूर्ण आदर बाळगून वेगळी भूमिका मी घेऊ इच्छितो.

कारण ‘आजार रेड्याला आन औषध पखालीला,’ असं तर होत नाहीये ना, ही शंका माझ्या मनात आहे. गरिबी, उपास, औदार्य, बलिदान, परोपकार असल्या भावनांचं आकर्षण खूप मोठं आहे आपल्या समाजात. पण या भावना अंतःकरणापासूनच्या असाव्यात असं काही नाही. नुसत्या प्रतिकात्मकेलाही कित्येकजण भुलतात. या भावनांचे देखावे, सोहळे मांडून या देशात पूर्वीपासून प्रचंड भोंदुगिरी चालत आलीय. दिल्लीतल्या 'निर्भया' प्रकरणानंतर देशात अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे मेणबत्ती मोर्चे निघाले होते, त्याची आठवण झाली. त्या मेणबत्तीवाल्यांच्या भावना खोट्या होत्या असं मला अजिबात म्हणायचं नाहीए. मुद्दा प्रतिकात्मकतेचा आहे. त्या मेणबत्तीवाल्यांची गर्दी आणि आजच्या उपासात काही साम्यस्थळं दिसतात.

जत्रेत जसे हौशे, नवशे आणि गवशे असतात तसं या दोन्हीकडच्या गर्दीत असणार. म्हणजे बघा –
एक दिवस उपाशी राहिल्यानं शेतकऱ्यांप्रतीचं ऋण व्यक्त करण्याची हौस भागवून घेणारे काही ‘हौशे’ असतील.
मनापासून शेतकऱ्यांबद्दलची कणव असणारे, त्यांच्या दुःखात सहभागी होऊ इच्छिणारे भाबड्या मनाचे, निरालस ‘नवशे’ नक्कीच थोडेतरी असतील.
परोपरकार, दानधर्म, त्याग, समाजाचं देणं वगैरे उच्च भावना एकाच उपासात व्यक्त करुन पराकोटीच्या संवदेनशीलतेला गवसणी घालू पाहणारे काही ‘गवशे’ही असणारच.

...या पलीकडं आणखी दोन वर्ग असू शकतात.
शेतकऱ्यांचे मारेकरी – हो. म्हणजे वर्षानुवर्षं राजकीय व्यवस्थेचा भाग असणारे कित्येक नेते-पक्षांनीही आजच्या उपासाला पाठिंबा दर्शवलाय. खरं म्हणजे सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या मुंड्या पिरगाळणारे हेच होते. पण आताच्या राज्यकर्त्यांच्या विरोधात आयतं कोलीत मिळतंय तर का सोडा म्हणूनही अनेकांनी उपाशी राहण्याचा संकल्प सोडलाय. हरकत नाही. या पश्र्चातबुद्धीचंही स्वागत.
सत्ता विरोधक – केंद्र व राज्यातल्या सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याची संधी शोधणारा वर्ग आहे. सरकार कोणाचंही असले तरी हा वर्ग कमी-अधिक प्रमाणात असतो. तेव्हा लोकशाहीनं बहाल केलेल्या या स्वातंत्र्याचंही स्वागतच.

माझी अडचण अशीय की यातल्या कोणत्याच वर्गात मी बसू इच्छित नाही. मग मी काय करावं?
एका दिवसाच्या उपासांन काय फरक पडणार, असा प्रश्न मला पडतो.
ज्या कुटूंबानं 31 वर्षांपुर्वी या जगातून निरोप घेतला त्याच्या स्मृती जागवण्यासाठी वेगळं काय करता येईल, याचा विचार माझ्या मनात येतोय. शेती आणि शेतकऱ्यांबद्दल शंका-प्रश्न उपस्थित केला तरी अलिकडं काहीजण लगेच अंगावर येतात. ‘राष्ट्रवादा’चा मक्ता घेणाऱ्या आणि ‘शेतकरीहिता’ची वकिली करणाऱ्या या भोंदुंमध्ये गुणात्मक फरक नाही. दोघंही सारखेच असहिष्णू. त्यांना बेदखल करावं हे बरं.
अमर हबीब यांच्या उपक्रमाबद्दल जराही अनास्था न बाळगता मी वेगळा पर्याय निवडतोय. अकारण उपाशी राहून शेतमाल व प्रक्रियायुक्त पदार्थांचा खप घसरवण्याची चूक मला करायची नाही. त्यापेक्षा शक्य तितक्या रास्त दरात शेतमालाची विक्री व्हावी म्हणून माझा वाटा मी नक्कीच उचलू शकतो -
1. शेतकरी बाजार, शेतकरी उत्पादक कंपन्यांची उत्पादनं यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून माझ्या शहरातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या वस्तू विकत घ्याव्यात म्हणतो.
2. शेतमाल, भाजीपाला आदी रोजच्या गरजेच्या वस्तू थेट शेतकऱ्यांकडून, अस्सल शेतकरी बाजारातून विकत आणाव्यात म्हणतो.
3. शेतमालाला-प्रक्रियायुक्त पदार्थांना किंमत मिळत नाही, बाजार नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्यांची याद म्हणून आज माझ्या गरजेपेक्षा चार गोष्टी जास्तीच्या खरेदी करुन माझ्या मित्र परिवारात वाटाव्या म्हणतो.
4. शेतमाल विकत घेताना शक्यतो घासाघीस करणार नाहीच.
5. आजच्या दिवसापुरतंच नव्हे तर यापुढंही कधी कोणाला भेटवस्तू देण्याची वेळ आली तर शक्य तेव्हा थेट शेतकऱ्यांकडून घेतलेल्या वस्तू देत जाईन.
अर्थात मी लहान माणूस आहे. माझ्या गरजा थोड्या. माझ्या क्षमता अल्प. पण माझं हे म्हणणं माझ्या मित्रपरिवारांना सांगून पाहीन. सगळ्याच महत्त्वाचं हे सगळं करताना मी माझा स्वार्थच साधतोय. परमार्थ, संवदेनशिलता किंवा ऋणातून अंशतः उतराई होण्याची इतकी स्वस्तातली चैन मला नकोय. आताचा शहरी नागरिक असलो तरी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हे मला करायलाच हवं.
ताजा कलम – माझं आडनाव पाहून मला शेतीतलं काय कळतं असा खुळा सवाल कोणी करु नये. कारण माझा बाप कोरडवाहू शेतकरी आहे. ज्वारी-करडई पिकवणारा, वयाच्या सत्तरीतही दिवसभर मातीत राबणारा. असं नसंत तरीसुद्धा व्यक्त होण्याचा माझा अधिकार अबाधितच राहिला असता. कारण, “आम्ही शेतकऱ्यांची पोरं”, “आम्ही ग्रामीण भागातले”, “आम्ही शेतकरी”, “ज्याचं जळतं त्याला कळतं” असे दावे करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं जितकं नुकसान केलं तेवढं इतरांनी कधीच केलेलं नाही. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ,’ यातला भयाणपणा शेतकऱ्यांना जेवढा भोगावा लागला तेवढा खचितच इतर कोणाच्या वाट्याला आला असावा.

Next Article

Recommended