आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ‘ब्लू मॉरमॉन’ला राज्य फुलपाखराचा दर्जा, फडणवीस सरकारचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘ब्लू मॉरमॉन’ या जातीच्या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र हे राज्य फुलपाखरू घोषित करणारे पहिलेच राज्य ठरले आहे.
राज्य शासनातर्फे राज्याचे मानचिन्ह म्हणून राज्य प्राणी ‘शेकरू’, राज्य पक्षी ‘हरियल’, राज्य वृक्ष ‘आंबा’ व राज्य फूल ‘जारूल’ घोषित केले आहे. परंतु, राज्यात ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून कोणतेही फुलपाखरू नामनिर्देशित करण्यात आले नव्हते. निसर्गप्रेमींसाठी पक्ष्यांप्रमाणेस फुलपाखरेही आवडीचा व आकर्षणाचा विषय आहे. फुलपाखरू हा जैवविविधतेतील महत्त्वपूर्ण घटक व वनस्पतीसमवेत परस्पर संबंध असलेले महत्त्वपूर्ण कीटक आहे. राज्यात फुलपाखरांच्या जवळपास 225 प्रजातींची नोंद झाली असून, देशाच्या एकूण संख्येच्या 15 टक्के फुलपाखरे राज्यात आढळतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
फुलपाखरांचे अभ्यासक व निसर्गप्रेमी यांच्यामार्फत ‘राज्य फुलपाखरू’ म्हणून ‘ब्लू मॉरमॉन’ या प्रजातीचा विचार करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळाच्या मान्यतेकरीता ठेवण्यात आला होता.
‘ब्लू मॉरमॉन’ हे फुलपाखरू आकाराने सर्वात मोठे असलेल्या ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतर दुसरे सर्वात मोठे फुलपाखरू असून, हे फुलपाखरू मखमली काळ्या रंगाचे असते. त्याच्या पंखांवर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात. तसेच पंखांच्या खालची बाजू काळी असून, शरीराकडील एका बाजूवर लाल ठिपका असतो. विशेष म्हणजे हे फुलपाखरू श्रीलंका व भारतातील केवळ महाराष्ट्र (पश्‍चिम घाट) दक्षिण भारत व पूर्व समुद्र किनारपट्टीच्या क्षेत्रात आढळते. सद्य:स्थितीत सदर फुलपाखराचे आढळ विदर्भापासून ते पश्‍चिम महाराष्ट्रपर्यंत नोंदविले गेले आहे.
पुढे पाहा, अतिशय सुंदर अशा ब्लू मॉरमॉन जातीच्या फुलपाखराची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...