आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Blue Print Of Mns About Maharashta May Come At 10 Sept.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज ठाकरेंची ब्ल्यू प्रिंट 10 सप्टेंबरला? काय असणार मनसेच्या पोतडीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- राज ठाकरे)
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या विकासाबाबतची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत ब्ल्यू प्रिंट येत्या 10 सप्टेंबरला सादर होणार असल्याचे कळते आहे. मनसेने मुंबईतील षण्मुखानंद सभागृह 9 आणि 10 सप्टेंबरला बुक केले आहे. त्यावरून माध्यमांनी अंदाज बांधला आहे.
दरम्यान, मनसे किंवा राज ठाकरेंकडून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मागील पंधरवड्यात ब्ल्यू प्रिंटवरून राज ठाकरेंनी मराठी माध्यमांना खडसावले होते. पोरगं आम्हाला होणार आणि काळजी यांना... सारखा दरवाजा का खटखटवता जेव्हा मुलं होईल तेव्हा सांगितले जाईलच. आतापासूनच काळजी कशाला करता, अशा शब्दात राज यांनी माध्यमांना फटकारले होते. आजही मनसेकडून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिली नसताना 10 सप्टेंबरला मुहूर्त असल्याच्या बातम्या सर्वत्र येत आहेत.
असे असले तरी राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटबाबत मराठी जनांत कमालीची उत्सुकता आहे. राज हे विकासाभिमुख नेते असल्याचे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळेच त्यांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र कसा असणार याची मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांना उत्सुकता आहे. याबाबत माहिती मिळत आहे की, मनसेने येत्या 9 व 10 सप्टेंबरला मुंबईतील षण्मुखानंद सभागृह बुक केले आहे. 9 सप्टेंबरला ब्ल्यू प्रिंटची रंगीत तालीम होईल. यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील. तसेच त्याचे सादरीकरण कसे करायचे याचे नियोजन करण्यात येईल. त्यानंतर 10 तारखेला जाहीर सादरीकरण होईल. या समारंभाला काही पाहुणे व मिडियाला आमंत्रित करण्यात येणार असल्याचे कळते.
राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये टापटीप शहरे, अत्याधुनिक बांधकामे, शहरातील रस्ते, सर्वांना पिण्याचे स्वच्छ पाणी, चांगल्या पायाभूत सुविधा, रस्ते, शौचालये, वीज, शिक्षण, रोजगार, पर्यटन, उद्योगासाठी पोषक वातावरण याबाबत सविस्तर विश्लेषण असेल. दरम्यान, मनसेच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये रस्तेविकास व टोल याबाबत काय धोरण असेल याची सामान्यांना उत्सुकता आहे.
उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी कोणताही गाजावाजा न करता शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर केले होते. त्याला सोशल मिडियातून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मनसेही लवकरच ब्ल्यू प्रिंट आणू इच्छित असल्याचे स्पष्ट होत आहे.