मुंबई- अभिनेता शाहरूख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्याबाहेर सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे बांधण्यात आलेला रॅम्प तोडण्याचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. दोन दिवसापूर्वी मुंबईतील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी लोकांच्या तक्रारीनंतर मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून
शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यासमोरील रॅम्प हटविण्याची मागणी केली होती.
शाहरुख खान हा मागील अनेक वर्षांपासून या रॅम्पवर
आपली व्हॅनिटी व्हॅन पार्क करत आहे.
शाहरुख खानच्या व्हॅनिटी व्हॅनला पार्क करता यावे यामुळे एक महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे होते. त्यामुळे या लोकांना माउंट मॅरी चर्चजवळून जावे लागत होते. वांद्र्यात प्रत्येक महिन्यात भरत असलेल्या यात्रेमुळे हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. मात्र, हा रस्ता बंद झाल्याने स्थानिक नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास होत होता.
स्थानिक रहिवाशांनी या रॅम्पला हटविण्याची मागणी वेगवेगळ्या माध्यमातून करीत होते. एका स्वयंसेवी (एनजीओ) संस्थेनेही याबाबत आवाज उठवला होता. मात्र, यश मिळाले नव्हते. मात्र, मागील आठवड्यात काही स्थानिक नागरिकांनी या भागातील भाजपच्या खासदार पूनम महाजन यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. तसेच हा रस्ता कसा सार्वजनिक आहे व त्याचा वापर शाहरूख बेकायदेशीर कसा करीत आहे याची कागदपत्रे दाखवून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
पूनम महाजन यांनी याची तत्काळ दखल घेतली व मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना याबाबत चौकशी करून रॅम्प हटविण्याची मागणी केली. महाजन यांनी सांगितले होते की, स्थानिक लोकांनी मला या रस्त्याची कागदपत्रे दाखविली आहेत व हा रस्ता सरकारी असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे या रस्त्याचा वापर सार्वजनिकरित्या सर्व नागरिकांना व रहिवाशांना करता आला पाहिजे. कोणतीही व्यक्ती अथवा संघटना सामान्य लोकांपेक्षा मोठी नाही.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅन व रॅम्पमुळे कसा अडवला गेला आहे रस्ता...