आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत कृत्रिम पाऊस पाडणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठाणे जिल्हय़ात कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग 1 सप्टेंबरपासून करण्यात येणार असल्याची घोषणा पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी गुरुवारी केली. त्यासाठी मुंबई महानगरपालिका 12 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
मुंबईस पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भातसा व वैतरणा नदीवर सात धरणे आहेत. या धरणांमध्ये सध्या 8 लाख 50 हजार दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत तलावात 12 लाख 50 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. सध्या या धरणांमध्ये मुंबईस 264 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात आली असून पाऊस पडण्याची कोणतीच चिन्हे सध्या दिसत नाहीत. त्यामुळे पालिकेत गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. दीर्घ चर्चेनंतर या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पाडण्यावर शिक्कामोर्तब झाले. आयुक्त सीताराम कुंटे म्हणाले की, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पालिकेने 'मॅकोरॉट' या इस्रायली सरकारच्या कंपनीशी बोलणी केली आहे. ढगांवरती सोडियम क्लोराईडचा मारा करण्यासाठी विमान भाड्याने घेण्यात येणार असून विमानाचे उड्डाण आणि लँडिंगसाठी ओझर (जि. नाशिक) विमानतळाचा वापर केला जाणार आहे. प्रयोगापूर्वी भारतीय उष्णदेशीय हवामान संस्था (पुणे) आणि भारतीय हवामान खाते (मुंबई) यांचे पालिकेने यंदा मार्गदर्शन घेतल्याची माहिती महापौर सुनील प्रभू यांनी दिली.