आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई मनपात भाजपच्या \'मोदी-मोदी\'ला शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या जयघोषाने प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर अपेक्षेप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी विराजमान झाले. विश्वनाथ महाडेश्वर यांना भाजपच्या ८३ नगरसेवकांनीही मते दिली. त्यामुळे १७१ मते मिळवून त्यांनी काँग्रेसच्या विट्ठल लोकरे यांचा पराभव केला. भाजपने मते दिली असली तरी महापौरांनी आपल्या पहिल्याच भाषणात राज्य सरकारवर टीका करत सरकारकडे पालिकेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याचे सांगितले. यावरून महानगरपालिकेत शिवसेना-भाजपमध्ये अजूनही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.    

विश्वनाथ महाडेश्वर आपल्या भाषणात म्हणाले, राज्य शासनाकडील प्रलंबित थकबाकीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजित प्रकल्पांना मूर्त रूप देणे आर्थिकदृष्ट्या अडचणीचे होत आहे. सरकारकडे १९९९ पासून प्रलंबित असलेली देणी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. भाजपसोबत असलेल्या अपक्ष नगसेविका मुमताज खान यांनी सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही, तर मनसेचे सातही नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिले होते. राष्ट्रवादी आणि एमआयएमचे सदस्य तटस्थ राहिले.  उपमहापाैरपदासाठी शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांना १६६ तर काॅंग्रेसच्या विन्निफ्रेड डिसाेझा यांना ३१ मते पडली. 

भाजपकडून मोदींचा जयघोष, कमळाचा हार; शिवसेनेनेही केला बाळासाहेबांचा जयजयकार 
विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड झाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणाबाजी केली. तर शिवसेनेकडूनही बाळासाहेब ठाकरेंचा जयजयकार करण्यात आला. तसेच नवीन महापौरांना भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘कमळा’चा हार घालून त्यांचे अभिनंदन केले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महापौरांना  शुभेच्छा दिल्या. शिवसेना आणि भाजप हे चांगले मित्र असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. महापौरपदाची निवड प्रक्रिया पाहण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत अादी उपस्थित हाेते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही विजयी मिरवणूक हजेरी लावून महापाैर- उपमहापाैरांना शुभेच्छा दिल्या व मुंबईकरांचे अाभार मानले.

मनसेच्या नगरसेवकांनी मारली दांडी...
दरम्यान, सप, काँग्रेस, राष्ट्रवादीने हात वर केले नाहीत. मनसेच्या नगरसेवकांनी दांडा मारली आहे. पक्षाकडून निरोप न आल्याने नगरसेवक कार्यालयातच बसून आहेत. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सहभाग घ्यायचा की नाही, पक्ष प्रमुखांकडून अद्याप सुचना मिळाल्या नसल्याचे मनसेच्या नगरसेवकांनी सभागृहात येणे टाळले.
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, सोलापूर पालिकेच्या महापौरपदी बनशेट्टी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...