आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boat Ambulance In State, Aditya Thackeray's Recommandation Accepted Minister

राज्यात बोट अॅम्ब्युलन्स, आदित्य ठाकरे यांची शिफारस आरोग्यमंत्र्यांनी स्वीकारली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फाेटाे
मुंबई - अत्यवस्थ रुग्णांना वेळेत आवश्यक ते वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी जलमार्गाचीही मदत घेऊन 'बोट अॅम्ब्युलन्स' सुरू करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन ही संकल्पना मांडली आणि सावंत यांनी पक्षश्रेष्ठींच्या या सूचनेच्या तत्काळ स्वीकार केला.

राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारच्या सहकार्याने दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या १०८ या रुग्णवाहिका सेवेची परिणामकारकता वाढवण्यासाठी आता जलमार्गाने रुग्णांची जलद ने-आण करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे बोट अॅम्ब्युलन्सचा प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. आदित्य ठाकरेंनी याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी आरोग्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली.

‘१०८’मध्ये महाराष्ट्र मागे
१०८ नंबरवरील रुणवाहिका सेवेच्या परिणामकारतेच्या बाबतीत देशातील इतर १७ राज्ये आपल्या राज्याच्या पुढे आहेत. शिवाय रुग्णवाहिका जरी वेळेत पोहाेचली, तरी त्यावर तैनात असलेल्या कर्मचा-यांना योग्य प्रशिक्षण नसल्याने अपघाती मृत्युदर वाढत असल्याचे निदर्शनास आल्याकडे आदित्य ठाकरेंनी आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या सादरीकरणादरम्यान ठाकरेंनी सुचवलेल्या अनेक सूचना या योग्य असून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशचा आदर्श
आंध्र प्रदेशात बोट अॅम्ब्युलन्स सेवा अस्तित्वात आहे. त्या धर्तीवर आपल्या राज्यातही ती सुरू करण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी केली. त्याबाबतचे सादरीकरणही गुरुवारी मंत्रालयात करण्यात आले आहे. अशी सेवा अस्तित्वात आल्यास वाहतूक कोंडीच्या त्रासातून रुग्णांची सुटका होणार असून त्यांना लवकरात लवकर आवश्यक ते वैद्यकीय उपचार मिळणे शक्य होणार आहे. तसेच केंद्राच्या सहकार्याने राज्यात सुरू असलेली ‘१०८’ रुग्णवाहिका सेवाही अधिक परिणामकारक करण्याबाबतही आदित्य ठाकरेंनी आरोग्यमंत्र्यांना सूचना केल्या.

टेली मेडिसिनसाठी हवी भरीव तरतूद
शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेडिसिन योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद व्हावी यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद व्हावी यासाठी आरोग्य खात्याने अर्थखात्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे. जिल्हा रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, ग्रामीण भागात आरोग्य सेवेची अधिकाधिक उपलब्धता, मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी उपाय करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठीही शिवसेनेचे प्रयत्न आहेत.