आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई /नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला मिळालेली शिक्षा आणि माफी यावर शनिवारीही चर्चा सुरूच होती. आमचे कुटुंब संजयला माफी मिळावी यासाठी त्याच्या पाठीशी आहे, असे बहीण प्रिया दत्तने म्हटले आहे. त्यासाठी सर्व पर्याय तपासून पाहिले जातील, असे तिने सांगितले. संजयच्या शिक्षेचा कालावधी कमी आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने म्हटले आहे, तर राज्यपाल शिक्षा कमी करू शकत नाहीत, असा दावा भाजपचे नेते महेश जेठमलानी यांनी केला आहे.
मुंबई बॉम्बस्फोटात संजयकडे शस्त्रे सापडल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली, परंतु बहिणीच्या नात्याने आणि कुटुंब म्हणून आम्ही नेहमी त्याच्यासोबत आहोत. कोणतेही कुटुंब हेच करेल. कुटुंब म्हणून हे योग्यदेखील आहे. त्याला वाचवण्यासाठी सर्व पर्याय तपासले जातील. एखाद्याला सुधारण्यासाठी तुरुंगात पाठवण्यात येत असेल तर मला वाटते, संजू पहिलेच सुधारला, असे प्रियाने म्हटले आहे. संजय दत्त मनाने अतिशय चांगला माणूस आहे. मला कायद्याची माहिती नाही, परंतु त्यांना माफी दिली गेली तर फार चांगले होईल, अशी प्रतिक्रिया अभिनेता तुषार कपूरने दिली.
शस्त्र कायद्यामुळे माफी अशक्य
राज्यघटनेत राज्यपालांना माफी देण्याचा अधिकार आहे, परंतु ते संजय दत्तला माफी देऊ शकत नाहीत. कारण ही शिक्षा शस्त्र कायद्यांतर्गत देण्यात आली आहे. त्यामुळे या कायद्यामधील दोषींना झालेली शिक्षा कमी करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही, असे भाजपचे नेते महेश जेठमलानी यांनी म्हटले आहे.
शिक्षेवरील लाजिरवाणी चर्चा बंद व्हावी : संघ
संजय दत्तला झालेली शिक्षा आणि माफी यावर सुरू असलेल्या चर्चेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सवाल उपस्थित केला आहे. एकीकडे ते पीडित आहेत, ज्यांचा दशकापासून असलेला संताप दोषींना झालेल्या शिक्षेमुळे शांत झाला आहे. दुसरीकडे, काही लोक एका स्टारला दोन मुले आहेत. त्याच्यावर कोट्यवधी रुपये लावण्यात आलेले आहे. यावरून गहजब करत आहेत. खरे तर या तार्याला कमी शिक्षा झाली आहे, असे संघाचे मुखपत्र पांचजन्यमध्ये प्रकाशित लेखात म्हटले आहे. मुंबईमध्ये ज्या स्फोटाने विध्वंस घडवला, त्याची शस्त्रे संजय दत्तच्या घरात सापडली आहेत. जरी ही शस्त्रे सामान्य माणसाच्या घरात सापडली असती तर अकांडतांडव करणारी ही मंडळी सामान्य माणसाच्या बाजूने उभे टाकले असते का, असा सवालही संघाने उपस्थित केला. म्हणूनच संजूच्या शिक्षेवरील लाजिरवाणी चर्चा बंद करावी, असे संघाने म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.