मुंबई - राज्यात यंदा भीषण दुष्काळाची स्थिती असल्याने काही मराठी अभिनेते महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत, तर बॉलीवुडमधील हिंदी अभिनेते मदतीसाठी का पुढे येत नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनीही सामाजिक बांधिकली जपत दुष्काळग्रस्तांना मदत करावी अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने व्यक्त केली आहे. मनचिकसेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या आशयाचे निवेदन तयार केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांनी दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी मदतीचा हात दिला आहे. महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, स्वप्नील जोशी हेदेखिल या कार्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे, शुटिंगसाठी गावोगावी फिरणा-या बॉलीवुडच्या तारकांना दुष्काळाची भयानकता दिसत नाही का ? महाराष्ट्राने हिंन्दी कलाकारांना भरभरून दिले आहे, त्यांना पैसा आणि प्रतिष्ठा महाराष्ट्राने दिली आहे. सलमान, आमिरसारखे काही अभिनेते समाजकार्य करताना दिसतात. मात्र इतरांपासून त्यांचे लाखो चाहते कोणता आदर्श घेत आहेत. असेही त्यांनी म्हटले आहे.
दिवसाला लाखो रूपयांचा खर्च
दिवसाला लाखो रूपये पार्ट्यांमध्ये खर्च करणा-या या तारकांच्या डोक्यात परोपकाराचा अंधार पडलेला असेल, तर त्यांचे सिनेमे ब्लॅक आऊट करणे गरजेचे आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपून सिनेतारकांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी खोपकर यांनी केली आहे.