आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छगन भुजबळांचा मुक्काम तुरुंगातच; हायकोर्टाने जामीन पुन्हा फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वैद्यकीय अहवाल पाहता छगन भुजबळ यांच्या आजाराच्या कारणास्तव लगेचच जामिनाची गरज नसल्याचे मत नोंदवत उच्च न्यायालयाने गुरुवारी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यापूर्वी ईडीच्या विशेष न्यायालयानेही भुजबळांना जामीन देण्यास नकार दिला.

महाराष्ट्र सदनप्रकरणी सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या भुजबळांनी तब्येतीच्या कारणास्तव जामीन अर्ज केला होता. त्यावर न्या. पी. एन. देशमुख यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत भुजबळांचे वकील अॅड. अमित देसाई आणि ईडीचे वकील अॅड. हितेन वेणेगावकर यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. ‘गरज असल्यास भुजबळांना तातडीने अद्ययावत सरकारी रुग्णालयातून सेवा पुरवली जाईल,’ असे अॅड. वेणेगावकर यांनी सांगितले. त्यावर सध्या महाराष्ट्र सदन कंत्राटात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी भुजबळांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले असले तरीही पैशाच्या बेहिशेबी देवाणघेवाणप्रकरणी अजूनही तपास सुरू असल्याने सध्या तरी त्यांना जामीन देता येणार नसल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी आपल्या वैद्यकीय अहवालावर हरकत घेत भुजबळांनी सरकारवर आपल्याला तुरुंगातच डांबण्यासाठी हा डाव असल्याचा अाराेप त्यांनी केला हाेता.

भुजबळ तंदुरुस्तच
छगन भुजबळांच्या कार्डियाक इन्झाइमने धोक्याची पातळी गाठलेली नाही. ईसीजीदेखील व्यवस्थित आहे. रिपोर्टवरची तारीख तांत्रिक अडचणींमुळे चुकीची असू शकते. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या असून त्याआधारे भुजबळ हे तंदुरुस्त आहेत हे जेजेच्या मेडिकल बोर्डाने सांगितले आहे. कोणत्याही डाॅक्टरने भुजबळांची प्रकृती ढासळली आहे, असा अहवाल दिलेला नसतानाही ते स्वत:हून कोर्टात आले आहेत.
- हितेन वेणेगावकर, ईडीचे वकील

भुजबळ पळणार नाहीत
एखाद्या रुग्णाच्या आताच्या लक्षणांचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो, तसेच त्याचा वैद्यकीय इतिहास पाहणेही आवश्यक असते. तुरुंगातील मानसिक ताणामुळे हृदयविकाराचा त्रास वाढण्याची शक्यता असते. ‘जेजे’चा अहवाल भुजबळांची तब्येत स्थिर सांगत असला तरीही संभाव्य धोक्यांबद्दल काय? त्यांच्या तब्येतीची माहिती असणाऱ्या डाॅक्टरकडून तपासणी करावी. भुजबळ पळून जाणार नसून ते चौकशीला उपलब्ध असतील.
- अॅड.अमित देसाई, भुजबळांचे वकील

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...