आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bombay High Court Order Of Aganint Women Harassment

महिलांची छेडछाड करणाऱ्यांना महिने झाडू मारण्याची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अंकित जाधव, मिलिद मोरे, सुहास ठाकूर आणि अमित अडखळे.. ठाण्याच्या पाचपाखाडी भागात राहणारे हे चार तरुण.. आता हे चौघेही जण पुढील सहा महिने प्रत्येक रविवारी आपल्या परिसरात आठ तास सार्वजनिक ठिकाणी झाडू मारण्याचे काम करणार आहेत. पण ही काही समाज सेवा नाही, तर चक्क उच्च न्यायालयानेच त्यांना ही शिक्षा दिली आहे.

दुर्गामातेच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांची छेड काढत त्यांना शिवीगाळ करणे आणि त्याबद्दल जाब विचारायला आलेल्या व्यक्तीच्या डोक्यात सळईने प्रहार करून त्याला अर्धमेला करण्याचा आरोप त्यांच्यावर होता.

ठाणे शहरातील पाचपाखाडी पोलिस ठाण्यात या चारही तरुणांवर महिलांची छेडछाड आणि खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल आहेत. मात्र आपल्याकडून हे गुन्हे अजाणतेपणी झाल्याचे सांगत ते गुन्हे रद्द करावेत, यासाठी या चौघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासाठी आरोपींच्या कुटुंबीयांनी तक्रारदार महिला आणि संबंधित व्यक्तीची माफी मागून तक्रार मागे घेण्याची विनंती केली होती. या अाराेपींना माफी देण्यास तक्रारदारांनी होकार दिल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली. त्यावर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्या.व्ही.एम.अचलिया यांनी या चारही तरुणांची चांगलीच खरडपट्टी काढली. तसेच या चौघांना पुढील सहा महिने दर रविवारी सकाळी ते ११ आणि संध्याकाळी ते वाजेपर्यंत आपल्या परिसरात झाडू मारण्याचे आदेश दिले. तसेच प्रत्येकी पाच हजार रुपयांची देणगी टाटा मेमोरियल रुग्णालयाला देण्याचेही आदेश दिले आहेत. तसेच हे चार जण पुढील सहा महिने खरोखरच आपल्या परिसरात नियमित झाडू मारत आहेत किंवा नाही यावर लक्ष ठेवून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

‘गुन्हे रद्द केल्यास आपण समाजासाठी चांगले काम करू. तसेच केलेल्या गुन्ह्यांचा पश्चाताप म्हणून आम्ही राहतो त्याठिकाणी किमान तीन महिन्यांसाठी आठवड्यातून एकदा साफसफाई करू’, असे आरोपींच्या वतीने न्यायालयास सांगण्यात आले. त्यावर न्यायमूर्तींनी तक्रारदार महिला आणि मारहाण झालेल्या व्यक्तीला समोर बोलावले. या महिलांचे वय काय आणि तुमचे वय काय, असा सवालही न्यायालयाने अाराेपींना केला. तसेच ‘या आरोपींना माफी द्यायची का?’, अशी विचारणा तक्रारदारांकडे केली. तक्रारदारांची संमती मिळाल्यावर न्यायालयाने या चाैघांना साफसफाईची शिक्षा दिली.