आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायरसीमुळे ‘मृत्युंजय’, ‘स्वामी’चे मार्केट घटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्रजी पुस्तकांमध्ये पायरसीने धुमाकूळ घातलेला असतानाच आता मराठी पुस्तकांनाही पायरसीची झळ बसू लागली आहे. ‘मृत्युंजय’, ‘श्रीमान योगी’, ‘स्वामी’ यांसारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांच्या पायरेटेड प्रती मार्केटमध्ये विकल्या जात असल्याने मूळ प्रतींची विक्री घटत चालली आहे. त्यांच्या विक्रीचा आकडा हा आता ७० टक्क्यांनी घटला असल्याचे पुस्तक वितरण संस्थांचे म्हणणे आहे.

इंग्रजीमध्ये चेतन भगतचे ‘हाफ गर्लफ्रेंड’ प्रकाशित होण्याआधीच त्याची पायरेटेड प्रत बाजारात आली होती. मात्र, तरीदेखील इंग्रजी पुस्तकांचे मार्केट मराठीपेक्षा अधिक असल्याने चेतन भगतच्या पुस्तकांची विक्रमी विक्री झाली होती. मात्र, मराठी साहित्यातील शिवाजी सावंत लिखित ‘मृत्युंजय’ आणि रणजित देसाई लिखित ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’, ‘ययाती’ या जुन्या तरीदेखील अद्यापही लोकप्रिय असलेल्या कादंबऱ्यांच्या विक्रीवर मात्र मर्यादित मार्केट असल्याने पायरसीचा परिणाम झाला आहे.

‘मृत्युंजय’ची पायरेटेड प्रत हलक्या प्रतीचा कागद व बारीक प्रिंट वापरून किमान १०० ते २०० रुपयांना पायरसीच्या मार्केटमध्ये उपलब्ध केली जाते. ययाती, श्रीमान योगी, स्वामी या कादंबऱ्यांचेही असेच मार्केटमध्ये पायरेटेड प्रतींमध्ये रूपांतर केले जाते. मूळ पुस्तकाची किंमत न परवडणारा वर्ग ही पुस्तके मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. परिणामी मूळ पुस्तकांच्या विक्रीवर परिणाम होतो.
कशी होते पायरसी?
अलीकडे प्रथितयश प्रकाशक आपल्या विश्वासू प्रिंटर्सकडूनच पुस्तकांचे प्रिंटिंग करून घेतात. मात्र, एकदा पुस्तक बाजारात आले की प्रिंटिंगचे तंत्रज्ञान स्वस्त झाल्यामुळे पायरेटेड मार्केट या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती मिळवून यथातथाच असणाऱ्या कागदावर या पुस्तकांची पायरेटेड कॉपी छापतात. बिहार, रांचीसारख्या ठिकाणी हे प्रिंटिंग केले जाते. मुंबईत या पायरेटेड पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
मार्केट घसरले?
समकालीन व इतर काही लेखक वगळता सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी’, शिवाजी सावंतांची ‘मृत्युंजय’, रणजित देसाईंची ‘स्वामी’ या कादंबऱ्या अद्यापही लोकप्रिय आहेत. वाचकांकडून या कादंबऱ्यांना अद्यापही चांगली मागणी आहे. मात्र, पायरसीमुळे त्याचा मूळ प्रतींच्या विक्रीवर होणारा परिणाम नुकसानकारक आहे. मूळ प्रतींचे ७० टक्के मार्केट या पुस्तकांच्या पायरसीने घसरवले आहे. वैभव पिंपळखरे
एका महिन्यात ‘मृत्युंजय’च्या ७०० प्रतींचा खप
पुण्यासारख्या शहरामध्ये ‘मृत्युंजय’ या कादंबरीच्या एकाच महिन्यात ७०० पायरेटेड प्रती एकाच स्टाॅलवरून खपवण्याचा विक्रम काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. छाेट्या पडद्यावरील ‘महाभारत’ या अलीकडेच संपलेल्या मालिकेमुळे ‘मृत्युंजय’सह ‘युगंधर’ या कादंबरीलाही मागणी वाढली होती.