आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात उभारणार 'पुस्तकांचे गाव', आराखडा सुरू; मराठी भाषा विभागाचा पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात अनेक गावे आपापल्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पण पुस्तकांचे एखादे गाव मात्र ऐकिवात नसावे... कारण तसे गावच राज्यात नाही. पण आता असे गाव वसवण्यात येणार आहे. राज्याच्या मराठी भाषा विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी विभागाची एक टीम कामालाही लागली आहे.

ब्रिटनच्या वेल्स प्रांतात हे-ऑन-वे गाव "पुस्तकांचे गाव' म्हणून ओळखले जाते. त्याच धर्तीवर राज्यात गाव वसवण्याची कल्पना आहे. या कामाला अंतिम आकार देण्याचे काम सुरू असल्याचे तावडे यांनी सांगितले. नामांकित ग्रंथालये, प्रकाशकांच्या मदतीने गावाची उभारणी करण्यात येणार आहे. पर्यटकांची वर्दळ असलेल्या एखाद्या शहरालगत एखादे नवे गाव वसवणे किंवा एखाद्या पर्यटन शहरालगत आधीच असलेल्या एखाद्या छोट्या गावाला पुस्तकांच्या गावात परावर्तित करणे अशा दोन पर्यायावर सध्या काम सुरू आहे. गावाची उभारणी पूर्णणे सरकारी खर्चाने करायची की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपचा आधार घ्यायचा यावरही खल सुरू आहे. मराठी भाषा विभागाची सहा जणांची टीम यावर काम करत आहे. स्वत: तावडेही नियोजनात जातीने लक्ष घालत आहेत. कच्चा आराखडात तयार होत असून, येत्या मराठी भाषा दिनापूर्वी उभारणीला सुरुवात करण्याचा टीमचा बेत आहे.

पर्यटनस्थळानजीक साकारणार हे गाव
मोजकी शहरे वगळता राज्यात वाचनसंस्कृती फारशी रुजलेली नाही. खास पुस्तके खरेदीसाठी लोक एखाद्या गावाला भेट देण्याची शाश्वती नाही. त्यामुळे महाबळेश्वर किंवा तशाच एखाद्या प्रसिद्ध पर्यटनस्थळाजवळ हे गाव असेल. म्हणजे पर्यटक या गावालाही भेट देतील. सुरुवातीला सुट्या व पर्यटन मोसमात हंगामी स्वरूपात हा प्रयोग केला जाईल. प्रतिसाद वाढल्यास टप्प्याटप्प्याने वर्षभर गावातील पुस्तकविक्री सुरू करण्यात येईल, अशी माहिती या टीममधील एक विनय मावळंकर यांनी दिली.

वैशिष्ट्यपूर्ण उंडणगाव
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव साहित्य संस्कृती जपणारे गाव आहे. कोरीव सागवानी वाडे, भव्य कमानी गावात आहेत. गावातील मंदिरात गावात व्याख्यानमाला, कविसंमेलन, कथाकथन कार्यक्रमही नेहमीच होतात. सोयगावच्या लोटू पाटलांची नाट्य चळवळही जपली जाते. जिल्ह्याचे मूळ रहिवाशी साहित्यिक, कलावंतांचा इतरत्र सन्मान झाल्यास त्यांना गावात बोलावून ‘माहेरचा आहेर’ दिला जातो. अशा या गुणी गावाची निवड व्हावी, अशी अपेक्षा श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केली.