आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात तेजी मोरया रे ऽऽ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गणरायाच्या आगमनानंतर आलेल्या अनेक सुवार्तांनी बाजाराचा मूड बदलला. रुपया सावरून त्रेसष्ठीच्या घरात आल्याने खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदीचा धडाका लावला. त्यामुळे सेन्सेक्स 727 अंकांच्या उसळीसह 19,997.10 अंकांवर पोहोचला. निफ्टीने तेजीचे द्विशतक ठोकत 5,896.75 ही पातळी गाठली. रुपयातील सुधारणा, सिरियातील तणाव निवळण्याची चिन्हे, ऑगस्टमध्ये निर्यातीत झालेली वाढ, वाहन विक्रीचा चढता आलेख आणि स्पेक्ट्रमच्या किमतीत झालेली घट या कारणांनी गुंतवणूकदारांच्या उत्साहाला उधाण आले आणि बाजाराने चार वर्षांनंतर मोठ्या तेजीचा आनंद लुटला.


तेजीच्या बैलावर स्वार असलेल्या बाजाराने दिवसभरात सातत्याने सकारात्मक वाढ नोंदवली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 27 समभाग वधारले. सर्व क्षेत्रीय निर्देशांकात तेजी दिसून आली. ऑटो निर्देशांकाने या तेजीचे नेतृत्व केले. भांडवली वस्तू, एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांनी या तेजीला बळ दिले. टाटा मोटर्स, भारती एअरटेल, हीरो मोटोकॉर्प आणि लार्सन अँड टुब्रो या समभागांची चांगली खरेदी झाली. डॉलरच्या तुलनेत रुपया सावरल्यामुळे सत्राचा प्रारंभ सकारात्मक झाला. दुपारच्या सत्रात निर्यात वृद्धीचे वृत्त धडकले आणि तेजीला उधाण आले. त्यात वाहन विक्रीत झालेल्या वाढीने भर टाकली. सिरियावर तूर्तास लष्करी कारवाई न करण्याचे संकेत अमेरिकेकडून मिळाल्यानेही बाजारातील सकारात्मक वाढीला बळ मिळाले.


सोने-चांदी स्वस्त
रुपया सावरून त्रेसष्टीत आल्याने सराफा बाजारात घसरण दिसून आली. मुंबई सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 525 रुपयांनी घसरून 30,585 झाले. चांदी किलोमागे 1985 रुपयांनी घटून 53,685 वर स्थिरावली. जागतिक सराफा बाजारातही मौल्यवान धातूंची चकाकी कमी झाली. सिरियातील तणाव आणि अमेरिका फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेबाबत संभ्रम यामुळे सोन्याचे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.


रुपया 140 पैशांनी सावरून 63.84 वर
सलग चौथ्या सत्रात रुपयाने डॉलरची धुलाई केली. मंगळवारी रुपयाने 140 पैशांची कमाई करत 63.84 पर्यंत मजल मारली. बँका, निर्यातदारांनी केलेल्या जोरदार डॉलर विक्रीमुळे तसेच सिरियातील तणावामुळे रुपयाला बळ मिळाले. विदेशी संस्थांनी शेअर बाजारात केलेल्या जोरदार खरेदीमुळे रुपयाला मागणी वाढली. मागील चार सत्रांत रुपयाने 379 पैसे म्हणजेच 5.6 टक्के कमाई केली आहे. अमेरिकेतील रोजगारीच्या आकडेवारीत अपेक्षित वाढ न झाल्याचा परिणाम डॉलरवर झाल्याचे निरीक्षण इंडिया फॉरेक्सचे सीईओ अभिषेक गोयंका यांनी नोंदवले. आयातीत घट झाल्याच्या वृत्ताने रुपयाला अधिक बळ दिल्याचे गोयंका म्हणाले.


निर्यात वाढीने तेजी
ऑगस्टमध्ये निर्यातीत झालेली वाढ आणि आयातीत आलेली घट यामुळे बाजारात तेजी दिसून आली. सिरियातील तणाव निवळल्यामुळे तेजीत भर पडली.
राकेश तारवे, उपाध्यक्ष -रिसर्च, मोतीलाल ओसवाल सेक्युरिटीज.


विदेशी संस्था सक्रिय
अनिवासी भारतीयांना नोंदणीकृत समभाग खरेदीची मुभा रिझर्व्ह बँकेने दिल्याने विदेशी गुंतवणूकदार सक्रिय झाले आहेत. थेट विदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून काही अटींच्या अधीन राहून अनिवासी भारतीयांना ही खरेदी करता येणार आहे. परिणामी विदेशी संस्थांनी बाजारात 2563.60 कोटींची खरेदी केली.