मुंबई - एखाद्या हिंदू व्यक्तीने इतर धर्मातील व्यक्तीबरोबर हिंदू पद्धतीने विवाह केलेला असला तरी तिला हिंदू विवाह कायद्यांतर्गत घटस्फोट मिळू शकत नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. निरंजनी रोशन राव यांनी त्यांचे पती रोशन पिंटो यांच्याकडून घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. राव या हिंदू असून पिंटो हे लग्नापासून अद्यापही ख्रिश्चन धर्माचे पालनकर्ते आहेत. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने निरंजनी राव यांची ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर निरंजनी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तीही न्यायमूर्ती व्ही. के. ताहिलरमानी यांनी फेटाळून लावली. कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निर्वाळा योग्य असल्याचे न्यायालयाचे मत असून त्यात हस्तक्षेप करणार नसल्याचे उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात स्पष्ट केले.
याचिकाकर्त्या निरंजनी यांनी वाईट वागणुकीच्या कारणावरून घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. 13 जानेवारी 1999 ला दोघांनी हिंदू पद्धतीने विवाह केला होता. विवाहाच्या वेळी त्या हिंदू, तर त्यांचे पती रोशन ख्रिश्चन होते, असे याचिकेत नमूद करण्यात आले होते. लग्नानंतरही या दोघांनी आपापल्या धर्मांचे पालन केले. हिंदू मॅरेज अॅक्टमधील महत्त्वाच्या तरतुदीनुसार विवाहाच्या वेळी वर आणि वधू दोघेही हिंदू धर्माचे असणे आवश्यक असते. या अटीचे पालन झाले नसल्याने विवाह फोल असल्याचा दावा याचिकाकर्त्या पत्नीने याचिकेत केला होता.
मात्र, कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची ही याचिका फेटाळून लावली. म्हणजेच याचिकाकर्त्याला हिंदू विवाह कायद्यांतर्गत अशी याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही. दोघेही विवाहाच्या वेळी हिंदू नसल्यामुळे या कायद्यानुसार त्यांना दिलासा मिळणे शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच उच्च न्यायालयानेही कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे स्पष्ट केले. अशा प्रकारची याचिका दाखल करण्याचा अधिकारच नसल्याच्या निर्णयासही उच्च
न्यायालयाने दुजोरा दिला.
हिंदू विवाह कायद्यातील महत्त्वाच्या बाबी
* विवाहाच्या वेळी वधू-वर दोघेही हिंदू धर्माचे असावेत.
* त्यांचा विवाह हिंदू धर्म विधीप्रमाणे व्हावा.
* घटस्फोटासाठी अर्ज करतानाही दोघांचा धर्म हिंदू असणे गरजेचे.