आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Both Government Pocket Robbers : Udhav Thare Blame On Congress Nationalist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन्ही सरकारे खिसेकापूंचे : कामगार मोर्चात उद्धव ठाकरे यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्र आणि राज्यातील आघाडीची सरकारे केवळ खिसेकापूंची असून भ्रष्टाचार पचवण्याशिवाय त्यांना काही करता येत नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. डावे पक्ष आणि शिवसेनाप्रणीत 26 कामगार संघटनांच्या वतीने मुंबईत सोमवारी विशाल मोर्चा काढण्यात आला होता, या वेळी ते बोलत होते.

20 आणि 21 फेब्रुवारी रोजी कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सोमवारी काढण्यात आलेल्या मोर्चात आयटक, इंटक, सिटू, भारतीय कामगार सेनेचे कामगार सहभागी झाले होते. आझाद मैदानात मोर्चेक-यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर, महापौर सुनील प्रभू, मनोहर जोशी, मोहन रावले, आदित्य ठाकरे, नीलम गो-हे होत्या. तर डाव्या संघटनांचे के. एल. बजाज, उदय भट, डॉ. विवेक माँटेरो, र. ग. कर्णिक, प्रकाश रेड्डी, शांती पटेल आदी दिग्गजही उपस्थित होते. कामगारांचे संसार उद्ध्वस्त होत असताना राष्‍ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भोजनावळी घालण्यात दंग असल्याचा आरोप उद्धव यांनी केला. दिल्लीतील यूपीए सरकारला आगामी निवडणुकीत घरी बसवण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले.

सिटूचे के. एल बजाज म्हणाले की, 20 आणि 21 च्या बंदमध्ये 20 कोटी कामगार सहभागी होतील. डाव्या आणि उजव्या संघटनांची ही पहिलीच एकजूट इतिहास घडवेल.
शरद पवार लाळघोटे- ‘बाळासाहेबाच्या सभा केवळ बघ्यांच्या होत्या’ या अजित पवार यांच्या टीकेचा उद्धव यांनी समाचार घेतला. ‘शरद पवार यांनी लाळघोटेपणाचे आणि दगाबाजीचे राजकारण केले तसे शिवसेनाप्रमुखांनी केले नाही’, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
आता हात पुढे करणार नाही- राज ठाकरे यांच्यासमोर एकीसाठी मी हात पुढे केला होता; परंतु यापुढे मात्र टाळीसाठी कदापि हात पुढे करणार नाही, असेही उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.