आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- ब्रेन डेड झालेल्या रुग्णांच्या अवयवांचा इतरांना उपयोग व्हावा म्हणून आरोग्य विभागाने ऑक्टोबर महिन्यात काढलेल्या परिपत्रानंतर अवयव दान व प्रत्यारोपणाच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2012 दरम्यान, 166 जिवंत किडनी, 25 मृत व्यक्तींच्या किडनी, 10 मृत व्यक्तींच्या लिव्हरचे प्रत्यारोपण झाले आहे. आतापर्यंत राज्यामध्ये झालेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये ही संख्या सर्वात जास्त असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
नव्या परिपत्रकानुसार, एखादी व्यक्ती ब्रेन डेड झाल्यास आरोग्य खात्याच्या यंत्रणेला कळवणे हे प्रत्येक सरकारी व खासगी रुग्णालयाला बंधनकारक आहे. त्यामुळे त्या रुग्णाला अवयव दान करण्याच्या हेतूने गृहीत धरले जाऊ शकते. या निर्णयामुळे केवळ तीन महिन्यांमध्ये अवयव दान व प्रत्यारोपण शस्त्रक्रियांमध्ये वाढ झाली असून गरजूंना त्याचा मोठा फायदा होईल, असे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
विलासरावांच्या मृत्यूनंतर धडा- केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आजारी असताना योग्य वेळी लिव्हर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यापुढे तरी गरजूंना योग्यवेळी अवयव मिळावेत म्हणून आरोग्य विभागाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. एप्रिल ते डिसेंबर 2012 या नऊ महिन्यात ब्रेन डेड किंवा जिवंत व्यक्तींच्या 332 तर मृतांच्या 49 किडनींचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. जिवंत लिव्हर दोन तर मृत व्यक्तींच्या 19 लिव्हरचे प्रत्यारोपण झाले. दोन मृत व्यक्तींच्या फुप्फुसांचेही प्रत्यारोपण झाल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
दात्यांची संख्या वाढेल- ब्रेन डेड आणि मृत अशा दोन्ही व्यक्तींच्या अवयवांचा वापर गरजू रुग्णांसाठी होतो व नव्या परिपत्रकामुळे अवयव दान व रोपणाला कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. अनेक व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाइकांना अवयव दान करण्याची इच्छा असते, पण यंत्रणा कार्यरत नसल्याने तसे करता येत नाही, पण आता आरोग्य विभागाने तशी यंत्रणा कार्यरत केली असून आणखी लोक अवयव दानासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा संबंधित अधिकार्याने व्यक्त केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.