मुंबई- ब्राम्हण समाज महासंघानेही निवडणुकीच्या तोंडावर आपल्या मागण्या मान्य करेल त्याला पाठिंबा देऊ अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. ब्राम्हण महासंघाचे प्रवक्ते रवीकिरण साने यांनी याबाबत यांनी म्हटले आहे की, ब्राम्हण समाजाला कोणतेही आरक्षण नको आहे मात्र संरक्षण जरूर हवे आहे यासाठी आम्ही राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहोत. तसेच तो पक्ष आमच्या मान्य करेल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. दरम्यान याचाच भाग म्हणून महासंघाचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच गोपीनाथ मुंडे, राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.
ब्राम्हण महासंघाने 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी.पुरोहित म्हणून काम करणा-या समाजातील तरूणांना सरकारने दरमहा 5 हजार रूपये द्यावेत. याचबरोबर वेगवेगळ्या सार्वजनिक फ्लॅटफॉर्मवर व खासगीत ब्राह्मण समाजाला जातीवाचक शिवीगाळ केली जाते. त्यामुळे या समाजाला मानसिक व कायदेशीर सुरक्षितता लाभावी यासाठी या समाजाचा समावेश 'अॅट्रॉसिटी' कायद्यात करावा अशी ब्राम्हण समाज महासंघाची मागणी आहे.
दरम्यान, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक व नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले डी. एस. कुलकर्णी यांनी ब्राम्हण समाजाने सरकारने कोणतेही भीक मागू नये अशी भूमिका मांडली आहे. आपल्याकडे बुद्धी आहे, काम करण्यासाठी हात आहेत व कष्ट करण्याची तयारी आहे. त्यामुळे ब्राम्हण समाजाला मी विनंती करतो मी आपल्या कर्तृत्त्वावर पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. आपण सर्वांनी भारतीय ही संकल्पना पुढे घेऊन जावे. जाती-पाती समाज, धर्म यात तरुणांनी अडकू नये असे कुलकर्णी यांनी भूमिका मांडली आहे.
ब्राम्हण समाजाने पुण्यातून भाजपकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, काँग्रेस व मनसेने आपले मराठा समाजाचे उमेदवार दिल्याने भाजपनेही मराठा समाजाचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे ब्राम्हण समाज नाराज झाला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर ब्राम्हण समाजाचे घेतलेली आक्रमक भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरू शकते. तसेच आमच्या मागण्या करणा-या कोणत्याही अगदी काँग्रेसलाही आम्ही पाठिंबा देऊ अशी भूमिका महासंघाने घेतली आहे.