मुंबई - शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते साेडत नसल्याचे अनेकदा अनुभवास आले आहे. शुक्रवारी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना मांडून याची प्रचिती दिली. सावनेर येथील भ्रष्ट अधिकार्याला निलंबित करण्याची घोषणा खडसे यांनी नागपूरच्या अधिवेशनात केली होती. मात्र, अद्याप त्या अधिकार्याचे निलंबन झाले नसून हा सभागृहाचा अवमान असल्याचे पाटील म्हणाले.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांविराेधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केले होते. परंतु राष्ट्रीय जलसंपत्ती विकास प्राधिकरणाच्या महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याच्या प्रस्तावास सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यांच्यावर हक्कभंग आणावा, अशी विनंती आव्हाड यांनी केली.