आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादीचा एकही आमदार फोडून दाखवावा, माणिकराव ठाकरे यांचे दानवेंना आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे २१ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे सांगत आहेत. परंतु २१ तर जाऊ द्या, आमचा एक तरी आमदार त्यांनी फोडून व नंतर निवडून आणून दाखवावा’ असे खुले आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी दानवे यांना दिले.

प्रदेश काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे म्हणाले, ‘जे स्वत:च्या पुनर्वसनासाठी आमचे उंबरठे झिजवत होते त्यांनी आता आमचे आमदार फोडण्याच्या गप्पा करू नये. जे दानवे स्वत:च काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी रांगेत उभे होते तेच आता काँग्रेस-राष्ट्रवादीचे २१ आमदार फोडण्याच्या वल्गना करत आहेत. २१ आमदार तर सोडून द्या, त्यांनी एक तरी आमचा आमदार फोडावा. त्यास भाजपमधून तिकीट देऊन निवडून आणावे. त्यांनी असे केल्यास दानवे म्हणतील ती शिक्षा मी भोगण्यास तयार आहे,’ असे आव्हान ठाकरेंनी दिले.

दानवे काँग्रेसमध्ये येण्यासाठी तुम्हाला केव्हा आणि कुठे भेटले होते? याविषयी पत्रकारांनी ठाकरे यांना प्रश्न विचारले. त्यावर ‘ते दानवे यांना चांगले माहिती आहे. तुम्ही त्यांनाच विचारा,’ असे प्रत्युत्तर देत ठाकरे यांनी या प्रश्नास बगल दिली. निवडणुकीपूर्व एखाद्या आमदारास पक्षात प्रवेश देणे वेगळे आणि निवडणुकीनंतर एखाद्या आमदारास पक्षांतर करण्यास लावणे निराळे, असे सांगत राजीनामा देण्यास लावून एखाद्या आमदारास निवडून आणण्याची आज भाजपची ताकद उरलेली नाही, असा टोलाही ठाकरेंनी लगावला.