आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडेंना सल्‍ला देणा-या नवाब मलिक यांचेही घर फुटले, भावाचा मनसेत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांना घर सांभाळण्‍याचा सल्‍ला देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्‍याही घराला खिंडार पडले आहे. त्‍यांचे बंधू कप्तान मलिक यांनी सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. त्‍यांच्‍यासोबतच शिवसेनेचे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले यांनीही मनसेत प्रवेश केला. प्रवेशाच्‍यावेळी तिन्‍ही नेत्‍यांनी शक्ती प्रदर्शन केले. शिवसेनेत घुसमट झाल्याने पुन्हा मनसेत आल्याचे घाडी आणि चौगुले यांनी सांगितले.

नवाब मलिक यांचे बंधू कप्तान हे कुर्ला परिसरातून राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. गेल्या महापालिका निवडणुकीत कप्तान यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला होता. त्‍यामुळे त्‍यांनी दुस-या प्रभागातून निवडणूक लढविली. त्‍यात त्‍यांचा दारुण पराभव झाला होता. आता कप्तान मलिक यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन मनसेत प्रवेश केला. धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये प्रवेश केला त्‍यावेळेस नवाब मलिक यांनी गोपीनाथ मुंडे यांना टोला लगावला होता. अजित पवारांनीही मुंडेंना घर का फुटले याचे आत्मपरिक्षण करण्‍याचा सल्‍ला दिला होता. परंतु, आता मलिक यांच्‍याच घरात फुट पडली आहे.