मुंबई - बीटी कापूस बियाण्यांच्या उत्पादकांनी बियाण्यांचे दर १०० रुपयांनी कमी करावेत, असे आवाहन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी केले. शासनाने आवाहन केल्यानंतरही जर या बियाण्यांचे दर कमी झाले नाहीत, तर राज्य शासन अधिसूचना काढून दर कमी करेल, असा इशाराही खडसे यांनी दिला.
कृषी अधिका-यांच्या बैठकीनंतर खडसे म्हणाले की, ‘राज्यातील शेतकरी सातत्याने दुष्काळ, गारपिटीने त्रस्त झालेला आहे. बीटी कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांनी ४५० ग्रॅमच्या पाकिटाचा दर १०० रुपयांनी कमी करून शेतक-यांना दिलासा द्यावा. या बियाण्यांचे दर कमी झाले पाहिजेत ही राज्य शासनाची भूमिका आहे. राज्यात बीटी कापूस बियाण्यांच्या १०४ नोंदणीकृत कंपन्या आहेत. सध्या ४५० ग्रॅम पाकिटासाठी ९३० रुपये मोजावे लागतात. दर कमी झाल्यावर ८३० रुपये द्यावे लागतील.’