आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांचे धरणे: \'आम्ही सारे पानसरे\'च्या घोषणा, शेतकरी मदतीसाठी सरकारला घेरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनील तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर सदस्यांनी निषेधाचे फलक दाखवत सरकारविरोधातील रोष व्यक्त केला. - Divya Marathi
विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, सुनील तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर सदस्यांनी निषेधाचे फलक दाखवत सरकारविरोधातील रोष व्यक्त केला.
मुंबई- महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला. विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या गाडीला घेराव घातला. दुष्काळाच्या काळात शेतक-यांना मदत मिळत नसल्याने व पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले. 'आम्ही सारे पानसरे' अशा घोषणा देत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करीत पानसरेंचे मारेकरी शोधण्याची विरोधकांनी मागणी केली. याचबरोबर दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना सरकार मदत कधी आणि किती करणार असा सवाल करीत धरणे आंदोलन केले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. येत्या 18 मार्चला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडतील. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कायदा-सुव्यवस्था अशा अनेक मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती आखत विरोधकांनी रविवारी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. राज्याला स्वतंत्र कृषिमंत्री व गृहमंत्री हवा अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद असले तरी भाजप सरकारच्या विरोधासाठी ते एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले. सरकारला घेरणार अशी वल्गना काँग्रेस आणि राष्ट्रवादी करीत असले तरी या दोन्ही पक्षांमधील समन्वयाचा अभाव आणि एकमेकांत असलेली वर्चस्वाची लढाई या अधिवेशनात पाहायला मिळेल व सरकार त्याचा फायदा उचलेल असे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्यातील मतभेद व वाद अधिवेशनापुरते बाजूला ठेवल्याचे सध्यातरी दिसत आहे.
गेल्या पाच वर्षांत राज्यात जेवढ्या शेतकरी आत्महत्या झाल्या त्यापेक्षा अधिक आत्महत्या फडणवीस सरकारच्या कालावधीत झाल्या आहेत. अवकाळीची नुकसान भरपाई देण्यास नकार देणा-या शेतकरीविरोधी सरकारचा आम्ही चहासुद्धा पिणार नाही अशी भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी घेतली. मराठवाड्यातील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतक-यांना सरकारने भरपाई दिली नाही. उलट भरपाईचे निकष मात्र कठोर केले. राज्यात पुरोगामी विचारवंतांना धमक्यांचे फोन येत आहेत. मुस्लिमांना आरक्षण नाकारले. धनगर आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर टाकला आहे. सरकारला याबाबत अधिवेशनात जाब विचारणार आहोत, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
फडणवीस सरकार येऊन आता चार महिने झाले आहेत. पहिले तीन महिने सरकारला स्थिरस्थावर होण्यासाठी आम्ही दिले होते. विरोधाला विरोध नको म्हणून आम्ही सामज्स्याची भूमिका घेतली होती. मात्र, या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेले एकही आश्वासन पाळले नसल्याचे दिसत नाही. याऊलट समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहे. शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, गारपीट, पानसरे यांची हत्या, मुस्लिम आरक्षण रद्द का केले तसेच धनगर आरक्षणाचे काय झाले आदी मुद्यांवर सरकारला अधिवेशनादरम्यान जाब विचारणार आहोत असे राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
गेल्या तीन महिन्यांत तीन हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे सरकारवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. राज्यात स्वाइन फ्लूच्या साथीचे थैमान घातले आहे. सरकारी रुग्णालयात खाटा शिल्लक नाही. टॅमी फ्लूच्या गोळ्यांचा काळाबाजार चालला असून या साथीला आळा घालण्यास राज्य सरकारची यंत्रणा साफ अपयशी ठरल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, ज्येष्ठ माकप नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे, शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत व माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून पहिल्या दिवसाचे कामकाज तहकूब करण्यात आले.
पुढे वाचा, विधान परिषदेच्या सभापती वादावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत तात्पुरते पॅचअप...