आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे..! पवारांच्या रुक्ष भाषणात कवितांचा शिडकावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे..


या कविवर्य ना. धों. महानोर यांच्या कवितेने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली. निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत होरपळत असताना पवार यांनी केलेल्या सर्मपक सुरुवातीने अर्थसंकल्पातून कोणते दान पदरी पडणार याबाबत अनेकांना उत्सुकता होती.

अर्थसंकल्पीय भाषणाच्या प्रारंभी पवार यांनी वसंतराव नाईक यांचे स्मरण केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली. ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच राजर्षी शाहू महाराज यांची भव्य स्मारके उभारण्याचे सरकारने ठरवले आहे. या स्मारकांसाठी आवश्यकतेनुसार प्राधान्याने निधी उपलब्ध केला जाईल. त्यानंतर टंचाईच्या परिस्थितीमुळे होरपळलेल्या जनतेच्या भावनांचा उल्लेख करत त्यांनी सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास, रस्ते विकास, वीज व ऊर्जा आदी क्षेत्रांसाठीच्या तरतुदी सांगितल्या. नागपूर, मुंबई, पुणे येथील मोनो व मेट्रो रेल्वेसाठीच्या प्रस्तावाला सत्ताधारी बाकांवरून प्रतिसाद मिळाला. तर तंबाखूवरील कर वाढवण्याचा उल्लेख करताच काही सदस्यांनी 'आबा.. आबा.' असा घोष केला. तेव्हा सभागृहात खसखस पिकली. भाषणाच्या अखेरीस पवार यांनी

मन एवढं एवढं, जसा खसखशीचा दाणा
मन केवढं केवढं, आभाळ बी मावेना..


बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा उल्लेख करत भाजपचे गिरीश बापट यांना मन मोठे करण्याबाबत सुचवले. पवार यांनी सुमारे तासभर केलेल्या भाषणात विरोधकांकडून एकदाही अडथळा आला नाही, हे विशेष.